Tuesday, January 04, 2022

शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे

बदार मिठी अन दुःखी पानगळीचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे

बेभान आर्जवी तृप्त तृप्त सहवास
एकांत लाजरा खुलतो फुलतो खास
लाघवी ओढ पण दुःख पुन्हा विरहाचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे

मोहावर होते जरी मात त्यागाची
अनिवार व्यथा व्याकुळते पानगळीची
लागती वेध सृजनाचे अन फुलण्याचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे

हुरहूर अंतरी असण्याची नसण्याची
चाहूल मात्र पण आत नव्या बहराची
विरहातच रुजते बीज पुनर्मिलनाचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे

जयश्री अंबासकर

2 comments: