Thursday, November 03, 2011

जखम


फिरते आहे घेऊन जखम एक ठसठसती
खपली आहे वरती, पण आतून भळभळती

वरपांगी कमालीचा हसरा चेहरा

आतून पार भेदरलेला, भित्रा नि बावरा

आविर्भाव आहेत सारे, जग जिंकल्याचे
शल्य सदा काळजात, सारे हरल्याचे

सवयीचं झालंय आता, हुकमी हसू
कधी मात्र दगा देतात आपलेच आसू

असेल का सोपं यापेक्षा, अश्वत्थाम्याचं जिणं
जखम दाखवत जगाला, तेल मागत फिरणं


जयश्री अंबासकर

Wednesday, November 02, 2011

आशा

कधी कधी फार व्याकुळ होतं मन..... !! काळज्या मनाला अतिशय अस्वस्थ करतात.  पण कुठल्याही गोष्टीत फक्त आणि फक्त Positive विचार करायचा असं ठरवलं की आपोआप मार्ग सुचतो आणि मन शांत होतं.


कासाविस जीव, आवंढा घशात 
अडकलेला श्वास, धडधड उरात 
विलक्षण बेचैनी, काहूर काळजात 
प्रश्नांचं थैमान, मनाच्या तळात 
उत्तरांची आशा, फक्त स्वप्नात 
स्वप्नातली उत्तरं, कधी उजेडात 
कधी उदास, भकास अंधारात 
चिंतेच्या भेंडोळ्या, अडकलेल्या वर्तुळात 
सुटकेची प्रतिक्षा, इतकंच का हातात ?
नक्कीच नाही..हार एवढ्यात 
बरंच काही आहे अजूनही हातात 
निसटलेले क्षण वेचायचे ओच्यात 
नव्याने रंग भरायचे जगण्यात 
उभारी कसोशीने जागवायची मनात 
कारंजं सुखाचं, हसेल दारात 

जयश्री अंबासकर 



दीपज्योती २०११ च्या दिवाळी अंकात छापून आलेली माझी कविता !