Wednesday, November 02, 2011

आशा

कधी कधी फार व्याकुळ होतं मन..... !! काळज्या मनाला अतिशय अस्वस्थ करतात.  पण कुठल्याही गोष्टीत फक्त आणि फक्त Positive विचार करायचा असं ठरवलं की आपोआप मार्ग सुचतो आणि मन शांत होतं.


कासाविस जीव, आवंढा घशात 
अडकलेला श्वास, धडधड उरात 
विलक्षण बेचैनी, काहूर काळजात 
प्रश्नांचं थैमान, मनाच्या तळात 
उत्तरांची आशा, फक्त स्वप्नात 
स्वप्नातली उत्तरं, कधी उजेडात 
कधी उदास, भकास अंधारात 
चिंतेच्या भेंडोळ्या, अडकलेल्या वर्तुळात 
सुटकेची प्रतिक्षा, इतकंच का हातात ?
नक्कीच नाही..हार एवढ्यात 
बरंच काही आहे अजूनही हातात 
निसटलेले क्षण वेचायचे ओच्यात 
नव्याने रंग भरायचे जगण्यात 
उभारी कसोशीने जागवायची मनात 
कारंजं सुखाचं, हसेल दारात 

जयश्री अंबासकर दीपज्योती २०११ च्या दिवाळी अंकात छापून आलेली माझी कविता !

No comments: