Wednesday, November 26, 2008

तू दिलेल्या वेदना

माझी ही गझल मायबोलीच्या प्रातिनिधीक गझल संग्रहासाठी निवडल्या गेलीये.   

तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही

भोगण्याचा शाप आहे नंदिनीला
आजही का आग प्रतिकारात नाही

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

उंब-याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

जयश्री 

2 comments:

Vishubhau said...

जयश्री ताई,

गझल लिहिण्याचे आम्ही फार अयशस्वी प्रयत्न केले , त्या मुळेच आम्हाला मराठी गझल लिहिणार्यां बद्दल फार आदर आहे !!!!
सुंदर गझल कुठेच मात्रा , लतीफ़ चुकला नाही ......
हार्दिक अभिनन्दन !!!!

आपला ,
(आनंदी) विशुभाऊ
http://networkbaba.blogspot.com

Prasanna Shembekar said...

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

BahoT Khub.