बंधन कुठले नको वाटते
पाश नको ते कोणाचे
मुक्त मोकळा श्वास हवा मज
नकोच दडपण कोणाचे
नको काळजी, नकोच चिंता
नको लढाई दुनियेशी
नको दु:ख अन् नको उसासे
नको लढाई पैशाशी
अजब मागणे जगावेगळे
ऐकून हसला मनामधे
"तथास्तु'" म्हणुनी गुप्त जाहला
देव दाटशा धुक्यामधे
सुखी जाहले वाटे मजला
मनापरी घडता सगळे
सुख परंतु डाचत होते
कारण मज ते का न कळे....
विचार करता गूढ उकलले
शांती झाली चित्ताची
बंधनातले सुख आकळले
किंमत कळली पाशाची
नयनी पाणी दुस-यासाठी
हास्य तयांच्या सुखामधे
कळले मजला हिच जिंदगी
व्यर्थ गुंतणे स्वत:मधे
बेचव दुनिया फ़क्त सुखाची
दु:खाने गोडी वाढे
दु:खानंतर येता सुख ते
जगण्याला मग रंग चढे
जयश्री
5 comments:
यथार्थ शब्दात जीवनाचे सार मांडले आहे. अभिनंदन!
कवितेमध्ये फार अप्रतिम गेयता आहे.
शेवटचे कडवे फार आवडले. जे हजार गद्य शब्दांत सांगता येणार नाही, ते तू एका कडव्यात सांगितले आहेस! तुस्सी ग्रेट हो! :-)
Apratim lekhan! My comments on few small srories and poems here - Saglynachya jeevnaat changle vaeet kshn yetaat pan ashya rachana vachun samor aalelya kathin prasnagna dheer denyacha avhaan aapan hun tayar hota jata - The insight one gets reading such simple but valuable stuff is creditable truly. - Keep it up Jayshree! -
अर्थ छान वाटला ... अप्रतिम
देवकाका, मल्हारी, विशाखा, संदीप....मनापासून धन्यवाद :)
Post a Comment