कळणार कधी तुज मौनामधली भाषा
मी वाट पाहते मनात ठेवुन आशा
बोलून संपते मौज उमजण्यामधली
मौनात जागते हुरहुर आतुरलेली
खेळून बघूया मौनाचा हा खेळ
जमतो का पाहू तुझा नि माझा मेळ
बोलेन फक्त मी डोळ्यांनीच तुझ्याशी
कळते का पाहू बोली तुला जराशी
मग तू ही बोल तुझ्या मौनाने सखया
मी ओळखेन बघ पैजेवरती लिलया
उलगडुनी सगळे बोलत बसतिल भोळे
बोलके तुझे बघ आरस्पानी डोळे
✍जयश्री अंबासकर