Tuesday, March 29, 2022

बहरलो नव्याने

तुझा स्पर्श होताच फुललो नव्याने
बहरलो पुन्हा मी बहरतोच आहे

✍जयश्री

#माझी_फोटोगिरी 
#सुबहकेनजारे

Friday, March 11, 2022

भेट आहे वादळी

मारली मी या जगाच्या थाप दारावर
मी तुझ्या साठीच आलो या नकाशावर

जोवरी होकार नाही मी न भानावर
लक्ष माझे बस तुझ्या एका इशार्‍यावर

जीवघेणा वार होतो थेट माझ्यावर
मोकळे सोडू नको ना केस वार्‍यावर

चुंबण्याचा मोह होता लाल ओठावर
तीळ होता द्वाड छोटासा पहार्‍यावर

भेट आहे वादळी ना चित्त थाऱ्यावर
भरवसा नाहीच माझा आज माझ्यावर

जयश्री अंबासकर

Sunday, March 06, 2022

वृत्त - लवंगलता

जीवनात प्रत्येक क्षणाचा उत्सव करते आहे
सुखासारखे दुःखाला पोटाशी धरते आहे

आयुष्याच्या बागेमध्ये दु:ख पेरले माझ्या
दु:खानेही बघा किती आयुष्य बहरते आहे

एक सुखाची रेघ मारली आहे उंबरठ्याशी
दु:ख बिचारे अडखळते अन मागे सरते आहे

किती शिकवले आयुष्याने पाटी अजून कोरी
काल गिरवलेलेच नेमके धडे विसरते आहे

वेग केवढा आयुष्याला वय ओसरुनी गेले
उर्मी जगण्याची अताच का मनी उभरते आहे

सहज मिरवते दु:ख, वेदना झोळीमध्ये माझ्या
वावरताना सुखासवे काळीज कचरते आहे

दैवाच्याही पोतडीतले प्रश्नच सरले बहुदा
माझे कायम हसरे उत्तर पुरून उरते आहे

जयश्री अंबासकर