सांज उतरती ओली
का लावुन हुरहुर
जाते
मन गाभा-यात कशाचे
काहूर पेटवुन जाते
अर्घ्यातुन पागोळ्यांच्या
सुखसर्वस्वाचे दान
चुकविती बापुडी
कौले
कुठल्या जन्मीचे
ऋण
संन्यस्त घरांच्या
भिंती
निथळती, गळती संथ
गतवैभव स्मरुनी
सारे
ढाळती आसवे मंद
काळोखाचा विळखा
मग
अधिकच काळा होतो
वाटते निसटले सारे
अन् जीव घाबरा
होतो
उदरातुन काळोखाच्या
उमलावा प्रेमपिसारा
स्पर्शातुन उमजत
जावा
जगण्याचा अर्थ निराळा
जयश्री अंबासकर