घनगर्द रानी धुके दाटलेले
किती प्रश्न सारे नभी साठलेले
कोडे नभाने असे सोडवावे
धरतीस हिरवे उत्तर मिळावे.
रेशिम धुक्याने उतरुन हलके
रेशीम काटे उरी जागवावे
नव्याने सलावी जुनी वेदना अन्
नवे गीत हॄदयी जन्मास यावे.
संमोहनाच्या गाफिल क्षणी या
तुझ्या आठवांनी लपेटून घ्यावे
रातीस यावा गुलाबी फुलोरा
भिजरे तराणे श्वासात यावे.
जयश्री अंबासकर
(माझी ही लोणावळ्याला झालेली कविता "दीपज्योती" ह्या दिवाळी अंकात छापून आलीये)