Sunday, August 23, 2020

तुम भी मान लेते

इन्कार की वजह तो हमसे भी पूछ लेते
राहे जरा बदलकर हमको ही ढूंढ लेते

यादे हमारी दिल में मेहफूज अब भी होगी
खुशबू हवा में थोडी उनकी उछाल देते

वो रात पश्मिनी सी भूले तो तुम ना होंगे
झिलमिल वही सितारे सपनों में छोड देते

वो बेरुखी तुम्हारी, वो बेवजह का रुठना
मुसकान एक प्यारी बदले में भेज देते

बाते सदा तुम्हारी मनवा ही हमसे लेते
थोडीसी जिद हमारी कभी तुम भी मान लेते

हम भी तुम्हारी तरहा बेफिक्र काश होते
थोडीसी बेवफाई तब काश हम भी करते

इस जिंदगीसे रुठकर यू अलविदा कहा क्यू  
कुछ सांस तुम हमारे दिल से उधार लेते  

जयश्री अंबासकर


Monday, August 17, 2020

दैवी परिमळ

माझा भारतम्हणता केवळ
अणुरेणुत रुधिराची सळसळ

सोबत आहे सांगुन जातो
खांद्यावरचा स्पर्शहि केवळ

राहत होते पापी निव्वळ
वास्तू शापित म्हणुनी केवळ

दोन टपोर्या डोळ्यांवरती
कडक पहारा करते काजळ

निव्वळ बाष्कळ होते पुष्कळ
शूर निघाला एकच केवळ

मौनातुनही बोलत होती
त्याच्या हृदयामधली खळबळ

घमघमतो हर प्रात:काळी
प्राजक्ताचा दैवी परिमळ

कडे कपारी रोखु शकती
त्या ओढ्याची निर्मळ खळखळ

आईपरि ना दिसते प्रेमळ
वडिलांच्या हृदयाची कळकळ

जयश्री अंबासकर


Saturday, August 15, 2020

किती भोग बाकी असावेत नक्की

किती श्वास द्यावे नि घ्यावेत नक्की
किती श्वास बाकी उरावेत नक्की

कसा काय साबित गुन्हा व्हायचा तो
पुरावे किती स्पष्ट द्यावेत नक्की

झुरावे, झुकावे….गुलामी करावी
अपेक्षा तुझ्या काय आहेत नक्की

न ओळख कुणाची न अनुबंध कुठले
कसे सूर जुळले असावेत नक्की

तुझे बंद डोळे उघडण्यास अजुनी
किती क्रूर अपराध व्हावेत नक्की

असावी किती ओल नात्यात अपुल्या
किती खोल अंकुर रुजावेत नक्की

किती क्लेश देतोस रे पांडुरंगा
किती भोग बाकी असावेत नक्की

जयश्री अंबासकर


Wednesday, August 12, 2020

मी भस्मसात झालो

सौंदर्य पाहुनिया, मी मंत्रमुग्ध झालो
ते अग्निकुंड होते, मी भस्मसात झालो

इश्कात मी बुडालो, बदनाम खूप झालो
बदनाम जाहलो पण, मी नामवंत झालो

जालिम तिच्या अदा अन्‍  विभ्रम किती निराळे
घायाळ फक्त मी ना, सारेच लुब्ध झालो

अभिमान फेकुनी मी, आशाळभूत झालो
दारातला तिच्या मी, लाचार श्वान झालो

आयुष्य उधळले मी, सारे तिच्याच पायी
वणव्यात वासनेच्या,  मी बेचिराख झालो

जयश्री अंबासकर

Sunday, August 09, 2020

पाझर कितीक सार्‍या दगडात पाहिले मी

मातापित्यास जेव्हा सौख्यात पाहिले मी
सौख्यास नांदताना सदनात पाहिले मी

त्या मैफिलीत सारे गंधर्व गात होते
ते सोहळे स्वरांचे साक्षात पाहिले मी

आईस रांधताना तादात्म्य पाहिले मी
वात्सल्य त्रिभुवनाचे घासात पाहिले मी

कविता, गझल नि गाणे ऐटीत वाचतो तो
शर शब्द मधुर त्याच्या भात्यात पाहिले मी

साऱ्या चराचरी या, नव-स्त्रोत जीवनाचा
पाझर कितीक साऱ्या दगडात पाहिले मी

वैराण भावना अन् स्थितप्रज्ञ कोरडेपण
निवडुंग रान सारे नात्यात पाहिले मी

जयश्री अंबासकर
१०.८.२०२०

Thursday, August 06, 2020

रुजवात

रिमझिमत नाचत
आली नाजुकशी सर
हलकेच अंतरीची
तिने छेडियली तार

सृष्टी हसली गालात
उगाचंच खुळ्यागत
सारे सारे आरस्पानी
सारे किती स्वप्नवत

लहरत सवे आला
वारा खट्याळ नाठाळ
पसरला आसमंती
मृदगंधी दरवळ

इंद्रधनुची कमान
उमलली आकाशात
मोती माळा ओघळल्या
पानापानात फांद्यात

धरतीचे पावसाचे
पुन्हा हितगुज झाले
भिजण्याचे रुजण्याचे
नवे सोहळे जाहले


जयश्री
अंबासकर
..२०२०