बेल वाजली दारावरची, एके दिवशी व्यस्त सकाळी दार उघडता उभी समोरी, देहाची अवघडुनी मोळी बांधा नाजुक वर्ण गव्हाळी, अंगावरती साडी चोळी केविलवाणी, तरी हासरी,
नजर विलक्षण सात्विक भोळी
वात्सल्याची मूर्ती आम्हा, देवाने पाठवली होती सेवाभावी राजाबाई, आईसाठी आली होती शांत संयमी वावरतांना, प्रसन्न मुद्रा कायम होती मृदू बोलुनी, गोड हासुनी, मन आईचे जिंकत होती
जरी वयाने लहान होती, काळजात पण माया होती जीव लावुनी घरास साऱ्या, घरातली ती झाली होती अति मायेने न्हाऊ माखू, आईला ती घालत होती पुरवुन आईचे डोहाळे, माय जणू ती झाली होती
सहज अचानक एके दिवशी, कथा तिची ती सांगत गेली मूल होइना म्हणुन खुशीने, केली सवतीला घरवाली सवत, शेज अन नवरा सोडुन,
चूल मूल अन घर सांभाळी आभाळासम कवेत घेई, सारे घरटे पंखाखाली
गतजन्मीचे तर नव्हते ना, बंध रेशमी हे जुळलेले ऋण कोणाचे कोणावरती, ना कोणाला ते आकळले सहवासाने तिच्या लाघवी, दुखणे सारे सुसह्य झाले गोड आणखी लेक मिळाली, सूर तिच्याशी सुंदर जुळले
समाधान अन तृप्ती घेउन, एके दिवशी आई गेली होउन व्याकुळ आईसाठी, हमसाहमशी ती ही रडली कोण, कोठुनी घरात आली, आपुलकीने अमुची झाली मनीमानसी सन्मानाने, राजाबाई आम्ही जपली
जयश्री अंबासकर
ही कविता माझ्या आवाजात तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर ऐकता येईल.
ही रात्र संपली आहे पण मग जाग अजुन का नाही गात्रात पेरलेली मदहोशी ओसरली का नाही डोळ्यात नीज पण गंधित सळसळ अजुनी चंदन देही बेहोशधुंदचांदणेअंतरीतसेचचमकतराही
त्या निशाकराचे संमोहन सारून जरा बघ आता किलबिलत गोड पाखरे सांगती जगी उषेची वार्ता प्राजक्ताने बघ कूस बदलुनी सडा घातला दारी उचलून चांदणे चंद्र बिचारा फिरला बघ माघारी
कोकीळ घालतो चराचराला मधुर बसंती हाळी चैतन्य पालवी मोहरून सृष्टीवर चवर्या ढाळी तो झेलत चंचल पहाटवारा हसतो पिंपळ गाली जमलेली मैफिल पारावरची बघतो वाकुन खाली
रविकिरणे बघ ना किती प्रफुल्लित राजस सोनसकाळी प्राजक्त मौक्तिके श्वेत केशरी ओघळती मखमाली देऊन अर्घ्य तू स्वागत कर तेजस्वी नवसूर्याचे श्वासात तजेला भरून गा तू, गीत नव्या स्वप्नांचे
जयश्री अंबासकर
ही कविता तुम्ही माझ्या आवाजात खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.