Sunday, June 30, 2013

थैमान

बाहेर पावसाने, थैमान घातलेले
हृदयात आठवांचे, काहूर पेटलेले

झड लागली कधीची, थांबेचना कशाने
आक्रोश हा घनांचा, आभाळ फाटलेले

अश्रूस पूर येता, दु:खास कोंब आले
बहरेल दु:ख माझे, अश्रूत पोसलेले

डोळ्यात आटलेल्या, वैराण भावनांच्या
होळीत खाक झाले, नवस्वप्न पोळलेले

दु:खात वेढलेल्या, या झोपडीत माझ्या
येईल का पुन्हा सुख, दारात थांबलेले

जयश्री अंबासकर

Tuesday, April 16, 2013

आजही


कायदा गुन्ह्यासवे जुंपणार आजही
काल वाकला तसा, मोडणार आजही

मारणार तोच अन्‌, तोच तारणारही
का पणास द्रौपदी, लागणार आजही

भरभरुन सौख्य तू कैकदा दिले मला
जीर्ण पोतडी पुन्हा फाटणार आजही

वायदा करुन तू, तूच तोडणार तो
कायदा तुझा पुन्हा चालणार आजही

जाहला भल्याभल्या पुत्रमोह कालही
इंद्र कवचकुंडला मागणार आजही

जयश्री अंबासकर

Wednesday, April 10, 2013

द्वंद्व





मी……
कावरीबावरी
पुन्हा…. !!
किती दिवस चालणार असं !!
किती दिवस गप्प बसायचं
मनातलं वादळ मनातच लपवायचं… !
तो आसूड फिरवत राहतो शब्दांचे.
अन्‌ मी फक्त झेलत राहते घाव त्याचे.
त्याचं संकुचित जग
आणि तो स्वयंघोषित स्वामी.
का म्हणून स्विकारलीये मी….त्याची ही गुलामी !!
का सोसतेय हे क्लेश अतोनात
जुळवत राहते शब्द… फक्त मनातल्या मनात.
घायाळ होते मीच
त्याच्या शब्दानं आणि माझ्या मौनानं.
………
दिवस, आठवडे त्याच विचारात जाणार
जीव सारखा कासाविस होणार
घुसमट माझीच होणार.
तो…..
तो बिनधास्त……
झालेल्या पडझडीपासून अगदी अलिप्त.
स्वत:च्याच विश्वात मस्त !
कधीतरी आठवण आली की येणार,
अन्‌ पुरेशी विद्ध झालेय ह्याची खात्री करुनच जाणार…. !
आणि मी…..
मी त्या जखमेची मलमपट्टी करत
पुन्हा त्याचीच वाट पाहणार.
तो आला की तितक्याच आवेगानं
त्याच्या गळ्यात पडणार.
त्याचा अहं कुरवाळत
पुन्हा पुन्हा घायाळ होणार.
पुन्हा शब्द जिंकणार
आणि पुन्हा पुन्हा मौन हरणार.
…….
पुन्हा ???
नाही…..!!
बास झालं.
मौनानं आता बोलायलाच हवं.
शब्दांना पराभूत करायलाच हवं.
मौनाची ताकद ओळखायला हवी,
शब्दांवर कुरघोडी करायलाच हवी.
…..
येईल का तो आज पुन्हा
शब्दांची घेवून मिजास पुन्हा
रेंगाळतोय दाराशी शब्दांचा वावर
मौनाचा ताबा झालाय अनावर
सलामी झालीये
तुंबळ युद्धाची
आता वाट फक्त…
दार ठोठावण्याची.
कधी शब्दांची माघार, कधी मौनाची हार
द्वंद्व मनाचं मनाशी, निरंतर सुरु राहणार.
मनाच्या समराला रोज सामोरं जायचं असतं
कधी कुणाला जिंकवायचं…. तुम्हालाच ठरवायचं असतं.

जयश्री अंबासकर

Thursday, March 14, 2013

समां है गझल का.... गझल का समां है !!



सुरेश भटांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना माझी मानवंदना माझ्या गझलेच्या रुपात !!

सावरावे जरा

वेदनेने नवे रूप ल्यावे जरा
सोसणे मोरपंखी दिसावे जरा 

गुंतले फार मी, पार नादावले
आवरुनी मना, सावरावे जरा 

बंडखोरी सदा भावनांची नको
चेहऱ्याने लपविणे शिकावे जरा 

आणभाका स्मरूनी गुलाबी जुन्या
आठवांनी पुन्हा मोहरावे जरा 

हात सोडूनिया दूर झालो जिथे 
पावलांनी तिथे अडखळावे जरा 

पापण्यांनो पहारे करा मोकळे 
आसवांना मुक्या वाहु द्यावे जरा 

जयश्री अंबासकर    

Wednesday, March 13, 2013

कदाचित


सुखासीन आयुष्य अळणी कदाचित
चवीला व्यथाही जरूरी कदाचित

म्हणावे तशी ती न जगली कधीही
जराही असोशी नसावी कदाचित

पुन्हा चंद्र, तारे झगडले निशेशी
पुन्हा अवस येण्याचि नांदी कदाचित

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित

जरा लांबलेलीच ती रात्र होती
दिशाहीन झाली असावी कदाचित

नको आणखी कोणताही उतारा
नशा वेदनांची पुरेशी कदाचित

उभा जन्म गेला करूनी गुलामी
हिशेबात अजुनी उधारी कदाचित

पिते ताक फुंकून फुंकून अजुनी
कुणी पोळलेली असावी कदाचित

सुखालाच केले म्हणे जायबंदी
बरळणे असावे खरेही कदाचित

जयश्री अंबासकर 

Friday, March 08, 2013

अळी मिळी गुपचिळी


सगळं होतंय ना मनासारखं
मग झालंय काय चेहेरा पाडायला ?
प्रश्न तेच पुन्हा पुन्हा...
सुख बोचतंय..... दुसरं काय...
उत्तरंही तीच.... त्यांचीच
पण बोलणार नाही मी...!!
का सगळं बोलून दाखवायचं...
का सगळं उघडून दाखवायचं...
मीच माझं कुलूप उघडायचं,
आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं.
मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार
मीच ती गोळा करायची
माझ्यासाठी....... ??
छे; कशाला.....
मी नाहीच बोलणार....
......
नकोय मला बिचारेपण
नकोय सहानुभूती
गोंजारतेय हल्ली व्यथांनाच
जपतेय त्यांची intensity  
बरं चाललंय हो आमचं
हल्ली चांगले मित्र मिळणं सुद्धा कठीण झालंय
पण हा दोस्त टिकलाय बराच
बघू किती दिवस देतोय साथ
सध्या तरी रमलेय त्यात
अहो, उसंतच देत नाही तो
बाकी काही करायला
म्हणून तर शिकलेय आजकाल
दु:खालाच गोंजारायला
ट्रेनिंग घेतेय सध्या चेहेरा हसरा ठेवण्याचं.
प्रॅक्टीस कर... नक्की जमेल म्हणाला तो
त्यात काय एवढं .....
मी आणखी काही वेदना देतो.
कित्ती सोप्पंय ..!!.
मी सगळं त्याचं अगदी मनापासून ऐकते
मज्जा येतेय....
निघतेय सोलवटून,
रक्ताळलेय...
पण प्रत्येक थेंबाला आस
आणखी नव्या दु:खाची.
बाकी पाश सारे सुटलेत...
तुटलेत...
कधी......
कळलंच नाही
मीच तोडलेत... ????
की तेच घाबरलेत.....
तुझ्या माझ्या यारीला...
बरंच झालं,
आता नाही येणार प्रश्न कुणाचे
नाही द्यावी लागणार उत्तरंही.
आत राज्य तुझंच...
प्रत्येक डाव तुझाच
खेळ तुझी खेळी
माझी फक्त अळी मिळी गुपचिळी !!


जयश्री अंबासकर


Tuesday, February 19, 2013

निष्पर्ण जाहले तुझ्याविना

निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही
मी जगत राहिले पुन्हा पुन्हा, उन्मळले नाही

आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी
पाण्यात अश्रु मिसळले कुणाला कळले नाही

वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही
मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही

शाळेत रोजची चिडाचिडी अन्‌ भांडाभांडी
का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही

का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती
रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही

जयश्री अंबासकर

Thursday, February 14, 2013

उत्सव


Valentine's Day Special :) 

मागे वळता दिसते जेव्हा
संसाराची चौकट हसरी
नकळत होते कशी अचानक
पापण्यांची या झालर भिजरी

आठवणी नव नवलाईच्या
लख्ख काही अन्‌ काही पुसटशा
काही गाफिल, सावध काही
चुकार अन्‌ लडीवाळ जराशा

कधी उतावीळ, कधी अनावर
शांत डोह कधी उगाच डचमळ
आवरतांना सावरतांना
सैरावैरा उठते मोहळ

आठवात त्या भिजतांना मग
काळ जरासा थांबून जातो
तुझ्यासवे या जगण्याचा मग
उत्सव होतो... उत्सव होतो.
 
जयश्री अंबासकर

Tuesday, February 12, 2013

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

गझल सम्राट भीमराव पांचाळेंनी आष्टेगावातल्या गझल संमेलनात प्रकाशित होणार्‍या प्रातिनिधिक गझल संग्रहासाठी सुरेश भटांचा एक मिसरा दिला आणि तरही गझल लिहायला सांगितली.

"मज दोन आसवांना हुलकावता न आले"

त्यावरुन ही तरही गझल लिहीली.

आयुष्य राजयोगी, उपभोगता न आले
माझे असून "माझे"संबोधता न आले

आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले

बरसात तू सुखाची केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

सोडून दूर सुख मी, दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले

जयश्री अंबासकर