Thursday, April 23, 2009

मन हळूच गाली हसले


अचानक इतका छान, गोड वारा सुटला ना.....  मनात खट्याळ  हसू उमटलं.... आणि मग...........

हा सुटला अल्लड वारा
मन पाकोळीगत झाले
रोमांचित काया सारी
मन हळूच गाली हसले

हे रंग मनाचे सारे
आकाशी कसे उमटले
जाणून गुपित ते गहिरे
मन हळूच गाली हसले

चाहुल खट्‍याळ कुणाची
मन अधिर अधिर का झाले
पाहून कपोली लाली 
मन हळूच गाली हसले

आतूर मनाला सावर
कानात कोण कुजबुजले
नजरेची बघुनी भिरभिर
मन हळूच गाली हसले

लाजून चिंब भिजलेले
मन हिंदोळ्याचे झाले
आंदोलन घेता बुजरे
मन हळूच गाली हसले

जयश्री


Tuesday, April 21, 2009

छळतो अजूनही का


पाऊस कुणाला कसं वेड लावेल ते शब्दात सांगणं कठीण !! पण ह्या गझलेतून व्यक्त करायचा प्रयत्न केलाय.

पाऊस कालचा तो छळतो अजूनही का
जाळून काळजाला झरतो अजूनही का

ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का

तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का

होती अशीच ओली, ती रात्र वेदनांची
उघडून त्याच जखमा, जगतो अजूनही का

पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा
विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का

आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या
मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का

जयश्री 

Tuesday, April 07, 2009

यावा अशात साजण


सुटे बेभान हा वारा
फुले उरात शहारा
यावा अशात साजण
देत गुलाबी इशारा

हृदयाच्या सागरात
लाटा उठाव्या खट्‍याळ
प्रीतीशरांनी सख्याच्या
व्हावे पुरते घायाळ

सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

निळाईने पसरावे 
आकाशाच्या कुरणात
गाणी गावी अवखळ
द्वाड वा-याने कानात

खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात

नभदीप तारकांचे 
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध

जयश्री

Tuesday, March 24, 2009

ओसाड राजमार्ग


सोपं जगायची सवय झाली की ....
कठीण उत्तरं नकोशी होतात

थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन
उत्तरं कशीबशी जुळवता येतात.

उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला
सापडतोच कुठला तरी वशिला

चढ उतार नकोच असतात
आडवळणं मग शोधली जातात

तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत
आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत

मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन
खरी वाट सोयिस्करपणे विसरुन

सवयी त्याच अंगवळणी पडतात
आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात.

जयश्री 

Sunday, March 22, 2009

अशक्य केवळ


तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ

नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ

तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ

तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ

जयश्री

Monday, March 16, 2009

दुसरा कुणीच नाही.....


पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही

गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही
टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही

शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही

काळोख तुंबलेला दाही दिशात सारा
सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही

सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही

जयश्री अंबासकर




Thursday, March 12, 2009

तुझे चांदणे


तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते
तसे सोबतीच्या करारात होते

नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा 
तुझ्या मुक्त केसातही रात होते

पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला    
तुझे दाद देणे अकस्मात होते 

नसावे नशीबात घायाळ होणे 
तुझे तीर सारे पहा-यात होते

निशेला न ऐसेच वैराग्य आले
तुझे चांदणे ऐन बहरात होते

जयश्री

Sunday, March 08, 2009

भूल

भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला
बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला

चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली
बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली

सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा
मत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला

यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला
धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला 

शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली
का निशेची पैंजणे लाटांत त्या रेंगाळली 

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले

जयश्री

Monday, February 23, 2009

लज्जत सुखाची

लेवून तवंग सुखाचा
आयुष्य बनतं गुळचट
न अडचणींचे डोंगर आडवे
न आशांचे किल्ले रासवट
ऐश्वर्याच्या सरळसोट, उंचच उंच भिंती
न कुठे अश्रूंचा कोनाडा, न कुठे दु:खाची पणती
प्रकाशाची दारं उघडी सताड
रात्रीचा अंधारही कुंपणाच्या पल्याड
असतं आयुष्य असं
बेचव आणि अळणी
जरी पाऊस सुखाचा,
तोंडात मिठाची गुळणी
सुखाला हवी खरी, फोडणी खमंग दु:खाची
हिंग थोडा चिंतेचा अन्‌ मोहरी हवी कष्टांची
तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी
सुखाची अशा मग लज्जतच न्यारी.

जयश्री 

Friday, January 09, 2009

गुलाबी चांदणे

असाच तो अधून मधून जेव्हा डोकावतो मनात......तेव्हा मनातल्या भावना वेगळ्याच रुपानं बाहेर पडतात....

घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

लागे चाहुल तयाची मन आतूर आतूर
उरी गोड थरथर, लाज करी चूर चूर
कुणी उकलले माझे आज गुपित गुपित
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर
तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर
गाणे गाई वारा तुझे माझ्या कानात कानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात
न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

जयश्री