आयुष्य मी गुंफले
भोवती सख्या तुझ्या
स्वर्ग गवसला मला
भोवती सख्या तुझ्या
श्वास तू, मधुमास तू
सोबती हवास तू
तुझ्याविना अपूर्ण मी
आस तू, खास तू
आरंभ तू, अंत तू
गीत तू, संगीत तू
आयुष्य हे चांदणे
फ़क्त सदा हास तू
जयश्री
ऋण ते मातापित्याचे
केव्हाच तू उतरुन गेला
बंधु-भगिनींना सदा तू
संकटी तारुन गेला
सहजीवनाचा तू असा
समृद्ध पाया रोवला
शिरी राणीच्या तुझ्या तू
प्रिती तुरा रे खोवला
धाक असूनी आदराचा
मित्र बनला तू मुलांचा
गुंफ़ली नाती अशी तू
प्रिय बनला हर दिलाचा
जीवनी तुझिया सदा या
घडो आनंद सोहळे
लाभो तुला हे दीर्घ आयु
सार्थ आणिक आगळे
वर्धापनाच्या या दिनी रे
एक आहे मागणे
नित्य आम्हाला दिसू दे
गोड तव हे हासणे
जयश्री