तो आला अन्
दारी माझ्या बरसुन
गेला
गोड गुलाबी संमोहन तो
पसरुन गेला
माझा होता, केवळ
माझा होता जेव्हा
बाकी नाती होता
तेव्हा विसरुन गेला
रमले होते संसाराच्या
खेळामध्ये
नाही कळले डाव कधी
तो उधळुन गेला
नाते ताजे उरले
नाही बाकी आता
आठव का मग श्वासांनाही
उसवुन गेला
काळोखाची ओळख गहरी
झाली होती
कां तो येवुन अंतर
माझे उजळुन गेला
दरवळ सरला, सुकल्या
होत्या माझ्या बागा
हलका शिडकावा का
मजला फुलवुन गेला
जयश्री अंबासकर