नवरसांचा हा आविष्कार घडवून आणला आमच्या महाराष्ट्र मंडळानं. आमच्या वार्षिक संमेलनाची नवरसाची थीम मी अशी शब्दबद्ध केली. संगीतबद्ध केलं होतं विवेक काजरेकरांनी आणि गायक विवेक आणि मी.
तुम्ही ऐकूही शकता इथे
शृंगार रस
शृंगार मी प्रेमी जीवांचा
मीत हृदयी रुजवतो
स्पंदनातून इश्क पसरुन
मीलनी मी बरसतो
स्वप्नील मी, मदहोश मी
लाज-या प्रीतीत मी
साक्ष प्रणयाचीच मी अन्
चांदव्यातील आग मी
भयानक रस
उरी धडधड जागते अन्
कापते का ही तनू
प्राण का कंठास येतो
बोबडी वळते जणू
अस्तित्व माझे हे असूरी
जागवी भय अंतरी
उडे गाळण ही भल्यांची
दृष्टी टाकीन मी जरी
हास्य रस
तुषार माझे उडती जेथे
सुहास्य तेथे खळाळते
चैतन्याचे अल्लड वारे
मनी मानसी सळसळते
भेदभाव ना कोणासाठी
राजा रंका मी न वेगळा
दु:खाला तो नाही थारा
आनंदाचा सर्व सोहळा
बीभत्स रस
ओंगळवाणे रुप लाभले
बघुनी मला जन शहारती
नको वाटते दर्शन माझे
टाळून मज परी ते जाती
घृणाच सारी माझ्या पदरी
एकांताची साथ मला
तिरस्कार मी सदा झेलतो
बीभत्स म्हणती सर्व मला
करुण रस
नजर ओली, उरी हुंदका
मनात देवाचा धावा
दोन जीवांची विरही तगमग
तिथेच माझा जन्म नवा
दु:खाशी मी जरी जखडलो
मृत्यूशी झुंजतो सदा
कारुण्याचा सागर मी जरी
डोळे पुसतो मीच पुन्हा
वीर रस
शस्त्र शोभते माझ्या हाती
मीच शायरी वीरांची
रक्त उसळते,पेटून उठते
ऐकूनी गाथा शौर्याची
शूर शिपाई माझे साथी
नाही जागा दुबळ्याला
नको म्यान अन् नको विसावा
रक्त हवे तलवारीला
अद्भूत रस
स्वप्नी रमविते, स्वप्नी नेते
बाग फुलविते स्वप्नी मी
झिम्मा खेळत सवे प-यांच्या
गीत गोजिरे गाते मी
जादू, राक्षस, भूत, चेटकी
दुनिया माझी ही न्यारी
भूल पाडते, चटक लाविते
या जगती मी राज्य करी
रौद्र रस
गुलाम माझी सारी दुनिया
सैतानाचा साथी मी
हाहाकार मी उडवून देतो
दिसेल ते ते तुडवून मी
आगमनाची नांदी माझ्या
देई दर्शन भयकारी
समोर येईल त्याला चिरडून
तांडव करितो उरावरी
शांत रस
अवनीवरचा दूत शांतीचा
आश्रय देतो सकल जना
हारुन दु:खे जगताची मी
सांत्वन देतो श्रांत मना
ओंकाराचे संजीवन मी
भक्तीरसाचा मी दाता
पखरण करतो वात्सल्याची
तिन्ही जगाचा मी त्राता
जयश्री