Friday, March 24, 2023
समेट
Thursday, March 02, 2023
त्याच्या माझ्यामधले काही
Monday, July 11, 2022
वृत्त पतितपावन
Monday, April 25, 2022
खेळ मौनाचा
Tuesday, January 11, 2022
वृत्त - बालविक्रिडीत
Tuesday, January 04, 2022
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
बेभान आर्जवी तृप्त तृप्त सहवास
एकांत लाजरा खुलतो फुलतो खास
लाघवी ओढ पण दुःख पुन्हा विरहाचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
मोहावर होते जरी मात त्यागाची
अनिवार व्यथा व्याकुळते पानगळीची
लागती वेध सृजनाचे अन फुलण्याचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
हुरहूर अंतरी असण्याची नसण्याची
चाहूल मात्र पण आत नव्या बहराची
विरहातच रुजते बीज पुनर्मिलनाचे
शिशिरात चालते सत्र मोह-त्यागाचे
जयश्री अंबासकर
Monday, November 15, 2021
वृत्त - सिंहनाद
वृत्त – सिंहनाद
२ ८ २
मी थकलो धावुनिया
अन आलो तुजपाशी
सांभाळ मला देवा
घे कवळुन हृदयाशी
मी धावत का होतो
कळले न मला तेव्हा
मी चुकलो हे कळले
अन वळलो मी तेव्हा
हावरा अती झालो
वखवख सुटली फार
सांभाळू ना शकलो
जड देहाचा भार
नाती गोती सरली
उरले न सवे काही
निष्कांचन होउन मी
आलोय तुझ्या पायी
तो पैलतीर खुणवे
निर्मोही मन आता
बस तुझ्या पावलांची
अनिवार ओढ आता
जयश्री अंबासकर
Sunday, November 07, 2021
वृत्त - मदनतलवार
वृत्त - मदनतलवार
२ ८ ८ ८ ८ ४
(मांडणी १३ ८ ८ ९)
दुनियेत किर्र घनदाट हरवली वाट बिकट हा घाट दिसेना काही
लावले जगाने दार बंधने फार नवा अंधार सुचेना काही
लोटली युगे ना सरे जन्म हा झुरे रिक्तता उरे तेच ते भोग
वाटते पुरे हा त्रास सुखी आभास मुका वनवास फक्त उपभोग
का जुल्मी पुरुषी बळा सोसुनी कळा होउनी शिळा लावणे जीव
देहात नवा ओंकार नको आधार हवा अधिकार नकोशी कीव
रक्तात उसळते गाज सोडुनी लाज उधळते शेज आज सक्तीची
हृदयात पेटते आग जाळुनी बाग अंतरी जाग नव्या शक्तीची
शृंखला जरी पायात टाकुनी कात मी दिमाखात भरारी घ्यावी
लांघुनी शीव थाटात करावी मात नवी सुरुवात उद्याची व्हावी
या कभिन्न काळ्या तटी जरी एकटी परी संकटी तुझा आधार
ऐकुनी तुझी बासरी सख्या श्रीहरी पुन्हा अंतरी वाटतो धीर
जयश्री अंबासकर
Friday, October 22, 2021
वृत्त - देवराज
वृत्त - देवराज
गालगाल गालगाल गालगाल गालगा
ना समेट ना क्षमा न कोणतीच शक्यता
कोणता दुवा न आज ना तहास मान्यता
ऐकले तुझे किती न ऐकणार मी अता
ऐकणार फक्त तू सुनावणार मी अता
घाव रोज जे दिलेस तेच आठवून मी
विस्तवास आतल्या जपेन चेतवून मी
आग अंतरातली जिवंत ठेवणार मी
तीच आग घेउनी करेन भस्मसात मी
डावपेच तेच ते फुशारक्या तुझ्या किती
का समोरुनी लढावयास वाटते भिती
आखलास व्यूह तू जरी कुटील घातकी
भेदणार मीच ओळखून चाल बेरकी
वार फक्त सोसले अता न सोसणार मी
शस्त्र पारजून यापुढे असेन सज्ज मी
आपले हिशेब सर्व चोख फेडणार मी
एक एक डाव घेत युध्द जिंकणार मी
जयश्री अंबासकर
Monday, October 04, 2021
वृत्त - जगदीश्वरबाला
वृत्त : जगदीश्वरबाला
मात्रावली - २ ६ ऽऽ ८ ४
गोजिरवाणी ऽऽ गोंडस माझी छकुली
कळले न कधी ऽऽ केव्हा मोठी झाली
आभाळ नवे ऽऽ शोधत थेट निघाली
बघता बघता ऽऽ भुरकन उडुनी गेली
आकाशाला ऽऽ अता गवसणी घाली
मज आठवते ऽऽ अजुनी बोबड बोली
नव क्षितिजाची ऽऽ ओढ तिच्या पंखांना
होती रडली ऽऽ शाळेला जाताना
अंगण अजुनी ऽऽ तिच्या सयीतच रमते
“आई-आई” ऽऽ लाघव हाळी घुमते
होईल कधी ऽऽ फिरुनी ते बागडणे
वाचून तिच्या ऽऽ घरटे केविलवाणे
भेटेल तिला ऽऽ राजसवाणा कोणी
नेईल तिला ऽऽ बनवुन त्याची राणी
होतातच का ऽऽ लेकी भरभर मोठ्या
जातातच का ऽऽ सोडुन अपुल्या घरट्या
जयश्री अंबासकर
Wednesday, September 22, 2021
वृत्त - मंदारमाला
वृत्त - मंदारमाला गागाल गागाल गागाल गागा, लगागा लगागा लगागा लगा दाटून कंठात येतो उमाळा पुन्हा पापणीभार होतो रिता आभाळ होते जरा मोकळेसे ढगातून सार्या व्यथा पांगता येती फिरूनी तुझ्या आठवांच्या सरी शल्य घेऊन ताजे पुन्हा दु:खास माझ्या नवा कोंब येतो तजेला जुन्या वेदनेला पुन्हा झाकोळ झाकोळ दाही दिशांना पुन्हा सर्द शून्यात संवेदना अंधार वेढा तनाला मनाला, पुन्हा अंतरी गोठती भावना येते अकस्मात चाहूल जेव्हा मनी जागती जाणिवांचे मळे चैतन्य येते तुझ्या पावलांनी पुन्हा चिंब होते सुखाचे तळे पाशात जुल्मी असा गुंतलो मी तुझी ओढ श्वासात ध्यासात या संमोहनातून बाहेर यावे न वाटे मनाला कधीही प्रिया ओढाळ वेल्हाळ माझ्या मनाला किती आवरू लावुनी शिस्त मी स्वाधीन केले स्वत:हून झालो तुझ्या चक्रव्यूहात बंदिस्त मी जयश्री अंबासकर ही कविता तुम्हाला इथे ऐकता येईल
Sunday, August 08, 2021
वृत्त - अर्कशेषा
वृत्त - अर्कशेषा
गालगाल गालगाल गालगाल गागा
चांदण्यात एकटीच आज मी सख्या रे
पार रात्र मी कशी करू तुझ्याविना रे
आठवातले अजून चिंब भास सारे
उष्ण पेटते अजून अंतरी निखारे
आग चांदण्यात तीच, तेच गार वारे
तू हवास या क्षणी नको मुळी पहारे
द्वाड चांदण्यातले चटोर धुंद तारे
पेटवून रोमरोम आणती शहारे
चांदणे टिपूर छेड काढते अता रे
चंद्रही अता फितूर ऐकुनी इशारे
देहधून वाजते अधीर गात्र सारे
रात्र ही भरात ये अता तरी सख्या रे
जयश्री अंबासकर
ही कविता तुम्ही माझ्या आवाजात इथे ऐकू शकता.
Monday, August 02, 2021
वृत्त - देवराज
देवराज वृत्त
गालगाल गालगाल गालगाल गालगा
भेटुनी सख्या तुला युगे कितीक लोटली
सांग तू कशी घडेल थेट भेट आपुली
दूर राहिलो तरी कधी न प्रीत आटली
ओढ मात्र आणखीच वाढली उरातली
भोगले तुझ्याविनाच तप्त कोरडे ऋतू
आपसूक गोठले मनातले किती ऋतू
मूक जाहले ऋतू कधी न हासले ऋतू
फक्त क्रूर भासले तुझ्याविना सख्या ऋतू
साद घातली किती मनास मी पुन्हा पुन्हा
हाक थेट पोचली तुझ्याकडेच रे पुन्हा
गुंतणे तुझ्यात मी असेल हा जरी गुन्हा
सांगते करेन मी असा गुन्हा पुन्हा पुन्हा
दूर राहुनी सख्या किती असे झुरायचे
शुष्क होउनी कशास सांग तू जगायचे
स्वप्न पाहते मनात एकरूप व्हायचे
एकदा तुझ्या मिठीत धुंद मोहरायचे
जयश्री अंबासकर
Thursday, July 22, 2021
वृत्त - मदिरा
वृत्त - मदिरा
लगावली - गालल गालल गाललगा ललगा ललगा ललगा ललगा
अल्लड मोहक डौल तिचा, हरिणीसम नाजुक चंचलता
हास्य खट्याळ खळीत तिचे, मधुकुंभ तिथे जणु होय रिता
सावळ सावळ रंग तिचा, तन सुंदर रेखिव शिल्प जणू
स्निग्ध तिच्या नजरेत नवे, खुलते फुलते नित इंद्रधनू
सिंहकटी लयबद्ध हले, घन रेशिम कुंतल सावरता
नित्य खुळे जन होत किती, दिलखेच अदा बघता बघता
लोभस शैशव का अजुनी, सरले न तिचे जपलेच कसे
लाघव वावर गोड तिचा, बघताच जिवा हर लावि पिसे
रूपवती गुणवान अशी, असतेच कुठे अवनीवरती
स्वप्न असे पण का न बघू, धरबंध कशास मनावरती
स्वप्न परी गवसेल कधी, कळले न कुणा न कळेल कधी
तोवर स्वप्न खुळे बघतो, जगता जगता गवसेल कधी
जयश्री अंबासकर
Thursday, June 24, 2021
वृत्त - भुजंगप्रयात
वृत्त – भुजंगप्रयात
लगागा लगागा लगागा लगागा
शिदोरीत बांधून भक्ती विठूची
निघाले झुगारून नाती जगाची
जरी वाट अंधूक अंधूक होती
तरी ओढ चित्ती विठू मीलनाची
तमा ना उन्हाची, दर्या डोंगरांची
न रानावनाची न काट्याकुट्यांची
कशाची भिती ना अता या कुडीला
मनी फक्त इच्छा विठू शोधण्याची
नसे दु:ख काही न चिंता उद्याची
नुरे कोणती आस ऐहीकतेची
अनासक्त झाले तरी वाटते रे
दिठीला मिळावी
मिठी सावळ्याची
न डोळ्यात गर्दी अता आसवांची
न जाणीव नेणीव आता कशाची
झगा षड-रिपुंचा न देहावरी या
अता भेट व्हावी जिवाची शिवाची
जयश्री अंबासकर
ही कविता तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर ऐकता येईल.
Friday, June 04, 2021
वृत्त - शुद्धसती
वृत्त - शुध्दसती
८ २ २ (प - +)
हसतात जर्द पिवळे
घड सोनझुंबरांचे
ग्रीष्मात अनुभवावे
सौंदर्य बहाव्याचे
धग सोसुनी बहावा
सुखहिंदोळे घेतो
वैभव कांचनवर्खी
जगताला दाखवतो
वणव्यातला निखारा
कवटाळुनी उराशी
मिरवतो डौल अपुला
गुलमोहर बघ हौशी
काहिली सोसताना
हसणे जरा पहा तू
शिक पोळुनी बहरणे
गुलमोहराकडे तू
बघ समरसून मनुजा
ऋतुसोहळे धरेचे
सांभाळ तूच आता
औदार्य निसर्गाचे
जयश्री अंबासकर
Sunday, May 30, 2021
वृत्त - पृथ्वी
वृत्त – पृथ्वी
लगालललगा लगालललगा लगागालगा
कधी तिमिर दाटतो गडद होउनी अंतरी
उगाच हळव्या मना विकल होउनी पोखरी
हताश हरल्या मनास नसते उभारी मुळी
मना बिलगती निराश ढग साचते काजळी
जुन्याच जखमा करून उघड्या रडावे किती
उगाच खपल्या पुन्हा उकरुनी बघाव्या किती
तसेच कवटाळणे परत त्याच दु:खास का
अशाच परिघातुनी सतत तू फिरावेच का
जरा उघड
कोष तू विहर या नभी मोकळ्या
जरा उमलू
दे,
पुन्हा बहरु दे तुझ्याही कळ्या
असेल जपला
कधी कवडसा पहा शोधुनी
दिसेल हसरी
तुझीच प्रतिमा तुला दर्पणी
जयश्री अंबासकर
खाली दिलेल्या लिंकवर ही कविता माझ्या आवाजात ऐकू शकता.
Friday, May 28, 2021
वृत्त - वनहरिणी
वनहरिणी वृत्त
मात्रा- ८+८+८+८
राजाबाई
बेल वाजली दारावरची, एके दिवशी व्यस्त सकाळी
दार उघडता उभी समोरी, देहाची अवघडुनी मोळी
बांधा नाजुक वर्ण गव्हाळी, अंगावरती साडी चोळी
केविलवाणी, तरी हासरी,
नजर विलक्षण सात्विक भोळी
वात्सल्याची मूर्ती आम्हा, देवाने पाठवली होती
सेवाभावी राजाबाई, आईसाठी आली होती
शांत संयमी वावरतांना, प्रसन्न मुद्रा कायम होती
मृदू बोलुनी, गोड हासुनी, मन आईचे जिंकत होती
जरी वयाने लहान होती, काळजात पण माया होती
जीव लावुनी घरास साऱ्या, घरातली ती झाली होती
अति मायेने न्हाऊ माखू, आईला ती घालत होती
पुरवुन आईचे डोहाळे, माय जणू ती झाली होती
सहज अचानक एके दिवशी, कथा तिची ती सांगत गेली
मूल होइना म्हणुन खुशीने, केली सवतीला घरवाली
सवत, शेज अन नवरा सोडुन,
चूल मूल अन घर सांभाळी
आभाळासम कवेत घेई, सारे घरटे पंखाखाली
गतजन्मीचे तर नव्हते ना, बंध रेशमी हे जुळलेले
ऋण कोणाचे कोणावरती, ना कोणाला ते आकळले
सहवासाने तिच्या लाघवी, दुखणे सारे सुसह्य झाले
गोड आणखी लेक मिळाली, सूर तिच्याशी सुंदर जुळले
समाधान अन तृप्ती घेउन, एके दिवशी आई गेली
होउन व्याकुळ आईसाठी, हमसाहमशी ती ही रडली
कोण, कोठुनी घरात आली, आपुलकीने अमुची झाली
मनीमानसी सन्मानाने, राजाबाई आम्ही जपली
जयश्री अंबासकर
ही कविता माझ्या आवाजात तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर ऐकता येईल.
Wednesday, May 19, 2021
वृत्त - भवानी
वृत्त भवानी
मात्रा - २ ८ ८
८ ४
ही रात्र संपली आहे पण मग जाग अजुन का नाही
गात्रात पेरलेली मदहोशी ओसरली का नाही
डोळ्यात नीज पण गंधित सळसळ अजुनी चंदन देही
बेहोश धुंद चांदणे अंतरी तसेच चमकत राही
त्या निशाकराचे संमोहन सारून जरा बघ आता
किलबिलत गोड पाखरे सांगती जगी उषेची वार्ता
प्राजक्ताने बघ कूस बदलुनी सडा घातला दारी
उचलून चांदणे चंद्र बिचारा फिरला बघ माघारी
कोकीळ घालतो चराचराला मधुर बसंती हाळी
चैतन्य पालवी मोहरून सृष्टीवर चवर्या ढाळी
तो झेलत चंचल पहाटवारा हसतो पिंपळ गाली
जमलेली मैफिल पारावरची बघतो वाकुन खाली
रविकिरणे बघ ना किती प्रफुल्लित राजस सोनसकाळी
प्राजक्त मौक्तिके श्वेत केशरी ओघळती मखमाली
देऊन अर्घ्य तू स्वागत कर तेजस्वी नवसूर्याचे
श्वासात तजेला भरून गा तू, गीत नव्या स्वप्नांचे
जयश्री अंबासकर
ही कविता तुम्ही माझ्या आवाजात खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.