Saturday, August 05, 2023

सुख म्हणावे मी कशाला

कोण जाणे काय होता शाप सुंदरशा घराला
एक मोठा दोर होता टांगला त्याच्या छताला

नक्र अश्रुंचा किती पाऊस अन् आक्रोश झाला
मात्र माझ्या हुंदक्याचा खूप झाला बोलबाला

रोज एखादी असावी वेदनाही सोबतीला
त्याविना येणार नाही मोलही नुसत्या सुखाला

वार झाले जीवघेणे ना कधी भांबावले मी
फक्त एका सांत्वनेचा काळजाला भार झाला

शिल्प सुंदर मानसीचे त्या क्षणी साकारण्याला
हो विधात्यानेच छिन्नी घेतली घडवावयाला

अंतरीच्या भावनांचा कोंडमारा फार झाला
पावसाने साथ केली आसवे लपवावयाला

मी सुखाला गाठण्याचा यत्न आटोकाट केला
"काय व्याख्या तव सुखाची," प्रश्न पाठोपाठ आला

जयश्री अंबासकर