Wednesday, August 24, 2022

दरवळते आहे

दरवळते आहे

तोच प्रश्न घेऊन उराशी उगाच का तळमळते आहे
उत्तर माहित असूनसुद्धा प्रश्नाशी अडखळते आहे 

एक पाखरु गोंडस हसरे केव्हाचे भिरभिरते आहे
क्षणात इकडे क्षणात तिकडे मनामधे सळसळते आहे

सांज केशरी ढळतानाही आनंदी गुणगुणते आहे
मनी मानसी गंध कस्तुरी कुरवाळत दरवळते आहे 

गालावरती सलज्ज गहिरी उमलुन लाली खुलते आहे
अधिर यामिनी चंद्रासोबत खिडकीशी घुटमळते आहे 

वाट पाहुनी, कूस बदलुनी रात्र गुलाबी छळते आहे
स्वप्नामधल्या स्पर्शलाघवी मिठीत मी विरघळते आहे

जयश्री अंबासकर

Tuesday, August 23, 2022

माणसे

जाती उगाच मोठ्या करतात माणसे
द्वेषात आंधळ्या मग लढतात माणसे

प्रत्यक्ष दूर असुनी कळतात माणसे
हृदयात खोल काही वसतात माणसे

अपयश बघून काही हरतात माणसे
गळफास आवळूनी मरतात माणसे

ईर्ष्या मनात धरुनी डसतात माणसे 
नागाहुनी विषारी बनतात माणसे 

पैसाच मित्र असतो म्हणतात माणसे
कवटाळुनीच त्याला जगतात माणसे 

खुर्चीस घट्ट धरुनी बसतात माणसे
सत्तेवरी कशाने चळतात माणसे 

नसतो कुणीच योगी असतात माणसे
मोहात वासनेच्या पडतात माणसे 

✍जयश्री अंबासकर