Showing posts with label वृत्त-बालविक्रिडित. Show all posts
Showing posts with label वृत्त-बालविक्रिडित. Show all posts

Tuesday, January 11, 2022

वृत्त - बालविक्रिडीत

वृत्त - बालविक्रिडीत
गाललललगा लगालललगा लगागालगा 

ती 

जन्मच उपरा तिला न कळते कसा आपुला
लिंग ठरवते जगात अजुनी तिचा दाखला
प्रश्न विखुरती तिला न मिळती कधी उत्तरे
पंख चिमुकले मिटून मग ती जगी वावरे

मौन पसरते हसू हरवते कसे ना कळे
मूक बरसणे मनात झुरणे तिचे ना टळे
वाहत असते उरात हळव्या तिची वेदना 
सोसत असते जरी विकल ती किती यातना 

व्याकुळ हरिणी समान दुबळी जरी देखणी
आर्जव करते सदाच झरते तिची पापणी
नाहक जळते बळे लपविते मनीच्या कथा
मूक बरसती जरी न दिसती विखारी व्यथा 

पारध करुनी जणू मिळविती शिकारीपरी
सावज म्हणुनी तिला फिरविती इशाऱ्यावरी
भोग पुरुष हे जगात असती असे जोवरी
ऐवज म्हणुनी तिला हिणवणे जगी तोवरी

घेउन ठिणगी करा फुलवुनी निखारा नवा
भोग स्मरुनिया उरात वणवा कुणी पेटवा
हिंमत करुनी स्वतःस घडवा दिशा दाखवा
रंग बदलुनी नभास अपुल्या नवे रंगवा

जयश्री अंबासकर