Tuesday, February 19, 2013

निष्पर्ण जाहले तुझ्याविना

निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही
मी जगत राहिले पुन्हा पुन्हा, उन्मळले नाही

आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी
पाण्यात अश्रु मिसळले कुणाला कळले नाही

वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही
मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही

शाळेत रोजची चिडाचिडी अन्‌ भांडाभांडी
का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही

का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती
रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही

जयश्री अंबासकर

Thursday, February 14, 2013

उत्सव


Valentine's Day Special :) 

मागे वळता दिसते जेव्हा
संसाराची चौकट हसरी
नकळत होते कशी अचानक
पापण्यांची या झालर भिजरी

आठवणी नव नवलाईच्या
लख्ख काही अन्‌ काही पुसटशा
काही गाफिल, सावध काही
चुकार अन्‌ लडीवाळ जराशा

कधी उतावीळ, कधी अनावर
शांत डोह कधी उगाच डचमळ
आवरतांना सावरतांना
सैरावैरा उठते मोहळ

आठवात त्या भिजतांना मग
काळ जरासा थांबून जातो
तुझ्यासवे या जगण्याचा मग
उत्सव होतो... उत्सव होतो.
 
जयश्री अंबासकर

Tuesday, February 12, 2013

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

गझल सम्राट भीमराव पांचाळेंनी आष्टेगावातल्या गझल संमेलनात प्रकाशित होणार्‍या प्रातिनिधिक गझल संग्रहासाठी सुरेश भटांचा एक मिसरा दिला आणि तरही गझल लिहायला सांगितली.

"मज दोन आसवांना हुलकावता न आले"

त्यावरुन ही तरही गझल लिहीली.

आयुष्य राजयोगी, उपभोगता न आले
माझे असून "माझे"संबोधता न आले

आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले

बरसात तू सुखाची केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

सोडून दूर सुख मी, दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले

जयश्री अंबासकर