Thursday, April 29, 2021

वृत्त - देवप्रिया/कालगंगा

चंद्रवर्खी यामिनीची भूल पडते सागरा
मीलनोत्सुक ओढ दोघा यामिनी अन सागरा 

चंद्रबिंदीला कपाळी लावुनी ती चंचला
घालते नाजुक कटीवर तारकांची मेखला 

चांदण्यांचे माप ओलांडून येता यामिनी
स्वागताला तो किनारी उंच लाटा घेउनी 

चांदणे लेवूनिया ती शिल्प सुंदर भासते
पाहता अनिमिष सख्या आरक्त होउन लाजते 

सागराच्या प्रियतमेचा नूर सावळ आगळा
रंगतो अवखळ अनोखा धुंद प्रणयी सोहळा 

शांत होते गाज हृदयी गोड हुरहुर राहते
प्रीतवेडे चांदणे लाटात त्या रेंगाळते 

रात्र सरते, सागराचे गात्र जागत राहते
अन तटावर लाट विरही शिंपल्यातुन वाहते 

*जयश्री अंबासकर*

No comments: