Monday, July 11, 2022

वृत्त पतितपावन

वृत्त  - पतितपावन
मात्रा - ८ ८ ८ २

सैरावैरा सुटतो वारा उडतो पाचोळा
नांदी होउन आगमनाची ढग होती गोळा 

टपोर थेंबांची मग नक्षी मातीवर ओली
हलके हलके बरसत बरसत रांगोळी घाली

मृद्गंधाचा दरवळ भिनतो ताजा श्वासात
मदहोशी हळुवार पसरते गात्रागात्रात

जसा वाढतो वेग सरींचा शहारते अवनी 
धुंद सरींच्या आवेगाने मोहरते अवनी 

कडाड ताशा ढोल वाजतो ढगात बेभानी
नभी दामिनी करते नर्तन चंचल मनमानी

जलधारांनी चिंब होउनी खळखळते नुसती
तृप्तीने आनंदाने मग सळसळते धरती

✍जयश्री अंबासकर 

No comments: