Friday, February 26, 2021

वृत्त - वंशमणी

 वंशमणी मात्रा वृत्त  -  ८ ८ ४

अभिमानाने आव्हान तिला त्याचे
मंजूर तिलाही युध्द श्रेष्ठतेचे
सत्ताच पाहिजे होती दोघांना
प्रतिस्पर्धी झालेत एकमेकांचे

सामर्थ्य केवढे माझ्या बाहूत
ना टिपूस येतो कधीच डोळ्यात
माझाच वाढतो वंश तुझ्या उदरी
माझेच पारडे झुके तराजूत

नाजूक जरी परि नाही मी अबला
चूल, मूल इतकाच परिघ ना उरला
घालते गवसणी मी आकाशाला
पारडे झुकावे माझ्या बाजूला

झुंज चालते अविरत ही दोघांची
तू तू मी मी होते बाचाबाची
होणार कधी जाणिव दोघांनाही
रथास असते गरज दोन चाकांची

कधि तिने झुकावे थोडे नरमीने
कधि त्याने घ्यावे जरा समजुतीने
करि सुकाणु घ्यावा आळीपाळीने
संसार करावा खेळीमेळीने.

जयश्री अंबासकर

वंशमणी वृत्तातली माझी कविता माझ्या आवाजात ऐका !!
तुम्हाला आवडली तर नक्की Like, Share आणि Subscribe करा !



Wednesday, February 24, 2021

वृत्त - लीलारति

लीलारति मात्रा वृत्त  - २ ८ ८ ३

इवलासा होता परीघ माझा जरी
परिघात सुखाचा वावर होता तरी
नव्हता जरि पैसा अडका माझ्या घरी 
होते परि जगणे कितीतरी भरजरी

मोहाची आली किती वादळे घरी
माघारी गेल्या किती विषारी सरी
राहिला अबाधित दाराचा उंबरा
पावित्र्य राखले घरात अन अंतरी

संसार ठेवला छोटा पण नेटका
ना दंभ कधीही उगाच केला फुका
मिळविली भाकरी केवळ कष्टावरी
मानाने जगलो कधी जाळल्या भुका

शांती, तृप्ती, संयमात झाले जिणे 
जगण्यात कधीही नव्हते काही उणे
मज समाधान देवाने इतुके दिले
पुरविले मनाचे सौख्याचे मागणे

आयुष्य वाटले जेव्हा सरल्यापरी
पाहिले त्याकडे जरा त्रयस्थापरी
मी कुबेर आहे कळले माझे मला
आकळले सारे हिशेब केल्यावरी

जयश्री अंबासकर

Sunday, February 14, 2021

वृत्त - सुमंदारमाला

वृत्त – सुमंदारमाला लगावली – लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

कितीदा कराव्या चुका त्याच त्या तू सुधरणार आहेस केव्हा मना
किती काळ फिरशील चक्रात दु:खी किती बोल तू लाविसी जीवना
किती वेळ गोंजारुनी दु:ख अपुले उराशी किती तेच कवटाळणे
उगाळून करतोस दु:खास ताजे किती ते उमाळे नव्याने पुन्हा
मिरवतोस भाळावरी कौतुकाने जुन्या त्याच जखमा कसा काय तू
शिळे होत आयुष्य संपून गेले जगायास बाकी विसरलास तू
तुझा तूच दोषी अशा वागण्याला शिव्याशाप दैवास देतोस का
असे दु:खकोषात जगणे स्वत:चे स्वत: मान्य केलेस का सांग तू
तुझ्यावर विखारी किती घाव झाले किती दंश झालेत जहरी तुला
किती तू बिचारा किती भाबडा तू किती या जगानेच छळले तुला
हिशेबात इतका रमलास दु:खी मना शून्य झाल्या तुझ्या जाणिवा
दिल्या कैक हाका सुखाच्या ऋतूंनी कशा बघ जराही न कळल्या तुला
अता दार उघडून बाहेर ये तू जरा मोकळा श्वास घे रे मना
तुझ्याभोवतीचे जुने पाश दु:खी करू दे कितीही नव्या वल्गना
नवा श्वास घे तू नवी आस हो तू नव्यानेच कर तू नवी कामना
तुझे मोकळे पंख पसरून घे रे तुझ्या अंबरी तू भरारी पुन्हा
✍जयश्री अंबासकर