Thursday, June 24, 2021

वृत्त - भुजंगप्रयात

वृत्तभुजंगप्रयात
लगागा लगागा लगागा लगागा

शिदोरीत बांधून भक्ती विठूची
निघाले झुगारून नाती जगाची
जरी वाट अंधूक अंधूक होती
तरी ओढ चित्ती विठू मीलनाची

तमा ना उन्हाची, दर्या डोंगरांची
रानावनाची काट्याकुट्यांची
कशाची भिती ना अता या कुडीला
मनी फक्त इच्छा विठू शोधण्याची

नसे दु:ख काही न चिंता उद्याची
नुरे कोणती आस  ऐहीकतेची
अनासक्त झाले तरी वाटते रे
दिठीला मिळावी मिठी सावळ्याची

न डोळ्यात गर्दी अता आसवांची
न जाणीव नेणीव आता कशाची
झगा षड-रिपुंचा न देहावरी या
अता भेट व्हावी जिवाची शिवाची

जयश्री अंबासकर

ही कविता तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर ऐकता येईल.



No comments: