Showing posts with label वसंत ऋतू. Show all posts
Showing posts with label वसंत ऋतू. Show all posts

Tuesday, February 24, 2026

नवसृष्टी

नवसृष्टी
(वृत्त - मालिनी)

शिशिर ऋतुप्रभावे, पर्णहीनत्व आले
गळत झडत पाने, वृक्ष संन्यस्त झाले
तरुतळ भिजलेला, गालिचा पल्लवांचा
रुदन खचित नाही, यज्ञ तो आहुतींचा

कुहु कुहु मग आली, साद ती कोकिळेची
लगबग सुरु झाली, मन्मनी या धरेची
पिवळसर उन्हाची तोरणे स्वागताची
लख लख लख नांदी, ही वसंतोत्सवाची

मिरवत ऋतु आला, देत आनंद हाळी
नववधुसम लज्जा, सृष्टीच्या गोड गाली
हरित हरित आता, पर्णसंभार वृक्षी
बहरुन तरु आले, लेउनी रंगनक्षी

सळसळ सृजनाची, अंगपांगी मृदेच्या
हरखुन अति सृष्टी, प्रेमरंगी स्वतःच्या 
कलरव मधु मोदे, अंबरी पाखरांचा
दरवळ भिनलेला, आसमंती सुखाचा

नकळत नवदृष्टी, देउनी मानवाला
शिकवुन ऋतु जातो, बाळगा संयमाला
पडझड जर झाली, आपुल्या जीवनाची
हिरवळ मखमाली, अंतरी ठेव साची

जयश्री अंबासकर