Saturday, June 04, 2022

साधायचे कसे

रांधायचे कसे अन्‌ भरवायचे कसे
आईशिवाय कोणा समजायचे कसे

अदृश्य उंच भिंती, पाषाण चेहरे
वस्तीत माणसांच्या निभवायचे कसे

वेढून घट्ट बसतो एकांत सारखा
विळख्यातुनी मनाला काढायचे कसे

दुःखात रंग भरुनी आयुष्य काढले
सुख झोपडीत आता शोभायचे कसे

अतृप्त राहते मन मोहात अडकते
निवृत्त तृप्त जगणे साधायचे कसे

काळाशिवाय कोणी शिकवू शकेल का
जगण्यात कण सुखाचे पेरायचे कसे

जयश्री अंबासकर

No comments: