Thursday, January 28, 2021

वृत्त - अनलज्वाला

वृत्त – अनलज्वाला 
मात्रा – ८ ८ ८

कणाकणाला व्यापुन उरते तुझी आठवण
आई मजला व्याकुळ करते तुझी आठवण

आयुष्याला कवेत घेते तुझी आठवण 
भिजल्या डोळ्यातुन पाझरते तुझी आठवण

चुकते जेव्हा रागे भरते तुझी आठवण
प्रेमाचेही शिंपण करते तुझी आठवण

अधिकाराने विचारतेही तुझी आठवण
कर्तव्याची जाणिव करते तुझी आठवण 

पळापळीने दमून करते तुझी आठवण
श्रांत मनाला मग सावरते तुझी आठवण

संयम, शांती रोज शिकवते तुझी आठवण
सदा यशाचे कौतुक करते तुझी आठवण

आई झाले आता अधिकच तुझी आठवण
लेक होउनी कुशीत शिरते तुझी आठवण

जयश्री अंबासकर

Saturday, January 16, 2021

अहान

 अहान... तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद !! खूप मोठ्ठा हो.... !! खूप मज्जा कर... !!

तुझ्या गंमतीजमती ह्या व्हिडियोत बघताना तुला खूप मज्जा येणारे... !!
~~~~~~~~~~~~~~~
काव्य आणि सादरीकरण - आज्जी - जयश्री अंबासकर
व्हिडियो आणि ओरीजनल बॅकग्राऊंड म्युझिक - मामू - अद्वैत अंबासकर


Saturday, January 09, 2021

वृत्त - सुमुदितमदना

वृत्त – सुमुदितमदना
मात्रा – ८ ८ ८ ३

रंगमहाली वाट पाहते भरून हिरवा चुडा
क्षण मज भासे युगासारखा उशीर का एवढा
या देहाची मैफिल अवघी तुझ्याचसाठी प्रिया
स्वप्न पाहते संसाराचे खुलते माझी रया

सोळा श्रृंगारांनी सजले घमघमतो केवडा
ओसंडुनिया पहा वाहतो सौंदर्याचा घडा
किती काळ मी कुडीत वणवा सुलगत ठेवू असा
तरूण आहे स्वप्न तोवरी ये ना तू राजसा

प्रतिक्षेत मग जाळत गेल्या दाहक रात्री अशा
किती मैफिली सजवत राहू देहाच्या मी अशा
जीवापाड मी प्रेम करावे असा नसे का कुणी
करेल का स्वीकार कुणी हा माझा जागेपणी

ओसरलेली मैफिल करते केविलवाणी दशा
सैरभैर मग फरफटलेल्या भरकटलेल्या दिशा
जीव नकोसा जरी वाटतो जगावेच लागते
रुक्ष कोरडे जीवन ओझे ओढावे लागते

कधीतरी मग ऐकू येतो मंजुळ पावा तुझा
ओढ लागते पैलतिराची ध्यास जिवाला तुझा
तगमग थांबुन देहाची या मना मिळे शांतता
भोगसोहळ्यातुनी होतसे देहाची मुक्तता

✍जयश्री अंबासकर
#गोदातीर्थ_उपक्रम

Tuesday, January 05, 2021

देवद्वार/अभंग छंद

स्वार्थात रमलो। जन्म गेला व्यर्थ।
सुखासाठी शर्थ । केली फार ॥

सुख ना मिळाले। झाली वणवण।
सदा भुणभुण। सुखासाठी ॥

स्वतःसाठी फक्त । जगलो केवळ ।
किती हे पोकळ । जिणे झाले ॥

कसे व्हावे सदा । माझ्याच मनीचे
कौतुक स्वतःचे। पुरे आता ॥

संध्याकाळ झाली। आयुष्याची जेव्हा।
आकळले तेव्हा। ज्ञान थोडे ॥

दुःखात लागतो । पाठीवर हात
तशी लागे साथ । सुखातही ॥

जिणे स्वतःसाठी । नसतेच जिणे ।
मनाचे मरणे । हेच असे ॥

✍जयश्री अंबासकर

Saturday, December 26, 2020

आता असे करूया

तरही गझल 
(मिसरा - सुरेश भट)

(नाही म्हणावयाला आता असे करूया)
जे आजवर उधळले  ते आज सावरूया

आहे बरेच काही हातात या घडीला
विनियोग या घडीचा थोडातरी करूया

आनंदकण जरासे शिंपूनिया बघूया
दुःखात जे तयांच्या झोळीत सुख भरूया

हातातुनी निसटले आयुष्य वाळुपरि ज्या
हातात त्या सुखाची ओंजळ नवी धरूया

घालून मुखवटा तो सर्रास जे मिरवती
त्यांच्या समोर आता चल आरसा धरूया

तो चंद्र, चांदणे अन् त्या तारका नकोशा
पोटात आग आहे  चल भाकरी स्मरूया

पाऊल अडखळोनी पडलो जिथे जिथे मी
ती वाट सोबतीने चल एकदा धरूया

तो एकदाच आला क्षण धुंद मीलनाचा
बाकी नकोच काही क्षण फक्त तो स्मरूया

ओसाड माळरानी एकांत आंथरूया
अन् चांदणे गुलाबी खुश्शाल पांघरूया

✍जयश्री अंबासकर

Friday, December 25, 2020

कहां हो तुम

Another Project with Talented Singer, Composer Nikhil Iyer !!

My Poetry with Background Score by Nikhil Iyer !!

If you like it ...Please Share n Subscribe!!







Friday, December 18, 2020

वृत्त - उध्दव

वृत्त - उध्दव 
मात्रा २+८+४ 

तोडून शृंखला बोजड
मी मुक्त मोकळी झाले
हा समाज आता म्हणतो 
बेछूट स्वैर मी झाले

हे मनाप्रमाणे जगणे
नाहीच कुणाला रुचले
मग विशेषणांची यादी
घेऊनच मी वावरले

मी पर्वा नाही केली
जग अधिक विखारी झाले
वाळीत टाकल्यावरती 
ते शांत जरासे झाले

या परंपरेच्या बेड्या
का तिच्याच पायांसाठी
निर्बंध अघोरी सगळे
का पुरुषी सत्तेसाठी

बेटावर माझ्या आता
मी श्वास मोकळा घेते
अन पंख पसरुनी माझे
मी गगनभरारी घेते

✍जयश्री अंबासकर

Wednesday, December 16, 2020

वृत्त - मध्यरजनी

वृत्त  - मध्यरजनी
लगावली - गालगागा x ४

साद घालुन अंबराला सोनपिवळी सांज गेली 
चंद्रआतुर आसमंता जाग आली रात्र झाली

नादमधुरा पावलांची मस्त मोहक देहबोली
तारकांच्या पैंजणांनी चंद्रवर्खी रात्र झाली

चंद्र संमोहन जगावर रातराणी झिंगलेली
शबनमी ह्या चांदव्याने चिंब ओली रात्र झाली

चाहुलीने भास्कराच्या भैरवीची वेळ झाली
चांदव्याच्या मैफिलीची सांगतेची वेळ झाली

जयश्री अंबासकर
#गोदातीर्थ_उपक्रम