Wednesday, October 31, 2012
Tuesday, May 01, 2012
जुळले अजून आहे
सरले बरेच काही, उरले अजून आहे
तुटले तरी जरासे, जुळले अजून आहे
वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्या
वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे
संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या
स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे
वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी
सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे
वाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी
सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे
आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे
ते भोगणे जरासे, उरले अजून आहे
उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे
वाळूत बांधलेले, टिकले अजून आहे
अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी
दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे
जयश्री
Thursday, April 26, 2012
मोहोळ
आठवणींचं मोहोळ
आज फुटलं फिरून
सयी छळती जीवाला
डंख मारून मारून
जुन्या पुराण्या जखमा
पुन्हा नव्याने सलती
भळभळा लागे वाहू
जरी खपली वरती
कधी आसूड शब्दांचे
गेले कातडी सोलून
कधी कुणी फसविले
गळा केसाने कापून
घाव वर्मावर झाले
काही काळजाच्या पार
परी दुखावून गेले
सग्या सोयऱ्याचे वार
साऱ्या कटू आठवांचे
येई मळभ दाटून
होई चित्त सैरभैर
राही काळोख भरून
ओझे झाले पापण्यांना
काळ्या सावळ्या ढगांचे
कोसळे झडझडून
मन ऋणी आसवांचे
जयश्री
Wednesday, January 18, 2012
Thursday, November 03, 2011
जखम
फिरते आहे घेऊन जखम एक ठसठसती
खपली आहे वरती, पण आतून भळभळती
वरपांगी कमालीचा हसरा चेहरा
आतून पार भेदरलेला, भित्रा नि बावरा
आविर्भाव आहेत सारे, जग जिंकल्याचे
शल्य सदा काळजात, सारे हरल्याचे
सवयीचं झालंय आता, हुकमी हसू
कधी मात्र दगा देतात आपलेच आसू
असेल का सोपं यापेक्षा, अश्वत्थाम्याचं जिणं
जखम दाखवत जगाला, तेल मागत फिरणं
जयश्री अंबासकर
Wednesday, November 02, 2011
आशा
कधी कधी फार व्याकुळ होतं मन..... !! काळज्या मनाला अतिशय अस्वस्थ करतात. पण कुठल्याही गोष्टीत फक्त आणि फक्त Positive विचार करायचा असं ठरवलं की आपोआप मार्ग सुचतो आणि मन शांत होतं.
कासाविस जीव, आवंढा घशात
अडकलेला श्वास, धडधड उरात
विलक्षण बेचैनी, काहूर काळजात
प्रश्नांचं थैमान, मनाच्या तळात
उत्तरांची आशा, फक्त स्वप्नात
स्वप्नातली उत्तरं, कधी उजेडात
कधी उदास, भकास अंधारात
चिंतेच्या भेंडोळ्या, अडकलेल्या वर्तुळात
सुटकेची प्रतिक्षा, इतकंच का हातात ?
नक्कीच नाही..हार एवढ्यात
बरंच काही आहे अजूनही हातात
निसटलेले क्षण वेचायचे ओच्यात
नव्याने रंग भरायचे जगण्यात
उभारी कसोशीने जागवायची मनात
कारंजं सुखाचं, हसेल दारात
जयश्री अंबासकर
दीपज्योती २०११ च्या दिवाळी अंकात छापून आलेली माझी कविता !
Tuesday, August 23, 2011
पावसाच्या देवा......
पावसाळा
आला, पाऊस मात्र नाही
आभाळ
भरुन आलं, पण कोसळलंच नाही
पावसाचा
देव म्हणे रुसला होता
माझं
गाव सोडून, बाकी बरसला होता
वेशीपल्याड
सारं काही भिजवत होता
मला
मात्र मुद्दाम विसरत होता
देवाकडे
जेव्हा मी गा-हाणं केलं
तेव्हा
त्याने त्याचं भांडार…. खुलं केलं
खेळी
मात्र पावसाने अशी काही केली
आई
माझी आभाळात उचलून नेली
केलं
पार पोरकं त्याने भर पावसात
विश्व
केलं उध्वस्त, फक्त काही क्षणात
बांध
फुटला डोळ्यांचा, आवरेना पाऊस
तेव्हा
मात्र सोबत माझ्या, रडला पाऊस
आता
फक्त पावसाळा, दुसरा ऋतू नाही
भिजलं
अंग पुसायला, आई मात्र नाही
पावसाच्या
देवा पुन्हा असं नको करुस
बदल्यात
पावसाच्या कुणाची, आई नको नेऊस
जयश्री
Thursday, December 02, 2010
मौनाचं वादळ
एकेक दिवस असा उगवतो ना..... !! आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं होतं..... छोट्या छोट्या गोष्टींनी डोळे भरुन येतात. नेमकं काय हवंय ते ही उमजत नाही. मग असाच सरतो ..... तो "एक" दिवस ....
काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज
कुठंतरी खोलवर दुखतंय आज
उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
जयश्री अंबासकर
Friday, November 12, 2010
चांदणं... तुझं
थांबलेली सांज,
कातरवेळ...
मनात तूच..
तसाच नेहेमीसारखा !
तेच जीवघेणं हसू ,
तीच बेफिकीरी.
त्या बेफिकीरीची भुरळ,
ते गुंतत जाणं...नकळत !!
ते बहाणे, ती धडपड, ती धडधड...
भेटण्यासाठी.
मग कबूली, ते उमजणं, समजून घेणं
तो बहर, तो मोहर....
सार्या जगाचा विसर !
पावसातलं भटकणं,
चांदण्यातलं भिजणं,
कवितेतलं रमणं,
डायरीतल्या गुलाबाच्या पाकळ्या....
...
..
अन् अचानक...
अचानक तुझं हरवणं ..
मग तुझं अस्तित्व
फक्त फ़ोटोतलं,
आठवणीतलं !
तो पाऊस, ते चांदणं, त्या कविता….पाकळ्या,
सारं काही पोरकं,
तुझ्याशिवाय !
आता सांज डोळ्यात,
रात्रीच्या प्रतिक्षेत
आणि रात्र.... रात्र तुझ्या चांदण्यात !
जयश्री अंबासकर
Monday, October 25, 2010
भिजरे तराणे
घनगर्द रानी धुके दाटलेले
किती प्रश्न सारे नभी साठलेले
कोडे नभाने असे सोडवावे
धरतीस हिरवे उत्तर मिळावे.
रेशिम धुक्याने उतरुन हलके
रेशीम काटे उरी जागवावे
नव्याने सलावी जुनी वेदना अन्
नवे गीत हॄदयी जन्मास यावे.
संमोहनाच्या गाफिल क्षणी या
तुझ्या आठवांनी लपेटून घ्यावे
रातीस यावा गुलाबी फुलोरा
भिजरे तराणे श्वासात यावे.
जयश्री अंबासकर
(माझी ही लोणावळ्याला झालेली कविता "दीपज्योती" ह्या दिवाळी अंकात छापून आलीये)
Subscribe to:
Posts (Atom)


