Saturday, February 27, 2010

रुजवू मराठी, फुलवू मराठी


हे मी लिहिलेलं आमच्या कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाचं अस्मिता गीत. आज मराठी दिनानिमित्त मुद्दाम ब्लॉगवर टाकतेय.

गीत - जयश्री अंबासकर
संगीत - विवेक काजरेकर
गायक - विवेक, जयश्री

इथे आपल्या ला ऐकता येईल.

http://maharashtramandalkw.org/index.php?option=com_content&view=article&id=41&Itemid=93&lang=en



हर दिलाची एक बोली
मी मराठी, मी मराठी
रुजवू मराठी, फुलवू मराठी

ह्या कुवेती वाळवंटी
रुजवू हिरवळ, ही मराठी
आसमंती गर्द काळ्या
चांदणे फुलवू मराठी

सोडुनी आलो जरी प्रिय
मातृभूमी आपुली
दूरदेशी तरीही आपण
जगवूया अपुली मराठी

लीन होऊन आज वंदू
मायभूमी आपुली
पांग फेडू याच जन्मी
जिंकवू अपुली मराठी

Wednesday, February 24, 2010

क्रिकेट

सगळीकडे सध्या क्रिकेटचा धडाका सुरु आहे. काल सचिनने तर कमालच केली. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनावर क्रिकटने ताबा मिळवलाय.

सचिनला मानाचा मुजरा !!

भारतीय लोकांच्या क्रिकेट प्रेमालाही एक कडक सॅल्यूट !!

ही कविता देखील पिल्लासाठीच लिहिलीये.

चारो तरफ मची है धूम
बच्चे, बूढे रहे है झूम

सचिन की जब बारी आयी
नये शतक की हुई तैयारी

घूमे जब धोनी का बल्ला
लोग मचाए हल्ला गुल्ला

हरभजन जब बॉल चलाए
दुश्मन के छक्के छूट जाए

ये है अपनी टीम इंडीया
विजयी रहे ये टीम इंडिया

जयश्री

गरज गरज जब बादल आये

ही आणखी एक कविता....पिल्लाच्या Homework साठी लिहिलेली.

तपती धरती खिल खिल जाए
गरज गरज जब बादल आए

आस लिये वो एक बूंद की
कडक धूप मे जलती रहती
काले बादल जब घिर आए
धरती मन ही मन मुसकाए

बूंदे आयी, खुशिया लायी
बिजली के शर संग है लायी
हर तपनकी वो आग बुझाए
गरज गरज जब जल बरसाए

जयश्री

Tuesday, February 09, 2010

नको आणखी


फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी

घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी

गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी

नजरेत जरबी कट्‌यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी

धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी

जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी

जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी

जयश्री

Sunday, January 31, 2010

रुतावे कुठे


न काट्‌यास कळले सलावे कुठे

रुतावे कुठे अन्‌ दुखावे कुठे

विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे

बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

तिरस्कार झेलून थकलो अता
अशा गुंतण्याचे निभावे कुठे

तुझे चांदणे गोंदले या नभी
निशेच्या नशेने वहावे कुठे

सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

जयश्री

Tuesday, January 12, 2010

दुरावा

येते का रे तुला आठवण माझी.... होतोस का रे माझ्यासारखाच तू ही व्याकुळ......!!

देतोस का उजाळा
त्या धुंद आठवांना
होतोस काय हळवा
स्पर्शून आठवांना

त्या एकल्या दुपारी
तो प्रश्न कापरासा
होकार लाजरासा
इन्कार ही जरासा

झाल्या कशा अचानक
सांजा अजून कातर
जगणे अवघडलेले
विरहातले निरंतर

आहे तसा शहाणा
अपुला जरी दुरावा
आतून पेट घेतो
पण हाच रे दुरावा

तैसाच चंद्र अर्धा
दोघांत वाटलेला
त्या पौर्णिमेत अजुनी
तू मुक्त सांडलेला

जयश्री अंबासकर

Thursday, April 23, 2009

मन हळूच गाली हसले


अचानक इतका छान, गोड वारा सुटला ना.....  मनात खट्याळ  हसू उमटलं.... आणि मग...........

हा सुटला अल्लड वारा
मन पाकोळीगत झाले
रोमांचित काया सारी
मन हळूच गाली हसले

हे रंग मनाचे सारे
आकाशी कसे उमटले
जाणून गुपित ते गहिरे
मन हळूच गाली हसले

चाहुल खट्‍याळ कुणाची
मन अधिर अधिर का झाले
पाहून कपोली लाली 
मन हळूच गाली हसले

आतूर मनाला सावर
कानात कोण कुजबुजले
नजरेची बघुनी भिरभिर
मन हळूच गाली हसले

लाजून चिंब भिजलेले
मन हिंदोळ्याचे झाले
आंदोलन घेता बुजरे
मन हळूच गाली हसले

जयश्री


Tuesday, April 21, 2009

छळतो अजूनही का


पाऊस कुणाला कसं वेड लावेल ते शब्दात सांगणं कठीण !! पण ह्या गझलेतून व्यक्त करायचा प्रयत्न केलाय.

पाऊस कालचा तो छळतो अजूनही का
जाळून काळजाला झरतो अजूनही का

ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का

तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का

होती अशीच ओली, ती रात्र वेदनांची
उघडून त्याच जखमा, जगतो अजूनही का

पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा
विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का

आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या
मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का

जयश्री 

Tuesday, April 07, 2009

यावा अशात साजण


सुटे बेभान हा वारा
फुले उरात शहारा
यावा अशात साजण
देत गुलाबी इशारा

हृदयाच्या सागरात
लाटा उठाव्या खट्‍याळ
प्रीतीशरांनी सख्याच्या
व्हावे पुरते घायाळ

सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

निळाईने पसरावे 
आकाशाच्या कुरणात
गाणी गावी अवखळ
द्वाड वा-याने कानात

खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात

नभदीप तारकांचे 
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध

जयश्री

Tuesday, March 24, 2009

ओसाड राजमार्ग


सोपं जगायची सवय झाली की ....
कठीण उत्तरं नकोशी होतात

थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन
उत्तरं कशीबशी जुळवता येतात.

उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला
सापडतोच कुठला तरी वशिला

चढ उतार नकोच असतात
आडवळणं मग शोधली जातात

तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत
आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत

मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन
खरी वाट सोयिस्करपणे विसरुन

सवयी त्याच अंगवळणी पडतात
आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात.

जयश्री