Tuesday, December 08, 2020

वृत्त - केशवकरणी

एक जोशपूर्ण वृत्त - केशवकरणी 
चरणसंख्या - २ 
पहिल्या चरणात मात्रा - २७
दुसऱ्या चरणात मात्रा - १६
(चाल - खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे चिंधड्या ।
उडविन राइ राइ एवढ्या ।) 

मशाल हाती कर्तृत्वाची जरी अंतरी व्यथा ।
घडविते मर्दुमकीच्या कथा ।

प्राक्तन आहे भोगत राहिन विचार होता खुळा ।
किती ती सोसत होती झळा ।

अफाट आहे सहनशक्ति दुबळी ती नाही मुळी ।
तरीही तिचाच नाहक बळी ।

समाज पुरुषी आणि ती तर आहे केवळ मादी ।
म्हणती वंशाची बरबादी ।

चूल मूल यातच अडकवुनी वरती करडी नजर ।
डोइवर तिनेच घ्यावा पदर ।

किती युगांचे तिचे सोसणे कष्टत अष्टौप्रहर ।
जग बघे तिचे नव स्थित्यंतर।

✍जयश्री अंबासकर 
७ डिसेंबर २०२०

Saturday, December 05, 2020

वृत्त - हरिभगिनी

हरिभगिनी मात्रावृत्त 
(८+८+८+६)

किती चाललो सोबत आपण आज दुरावा भासे का
तीच वाट अन तेच चालणे मणभर पायी ओझे का

किती ठरवले अता पुरे हे सोशिक जगणे मनोमनी
थकल्या नात्यामधे अजुनही क्षीण उसासे तग धरुनी

मोह कशाला पडतो अजुनी रुक्ष बेगडी नात्याचा
कंठशोष का जगापुढे मग असतो कायम मुक्तीचा

नाते तोडुन सुटका झाली तरी अंतरी झुरणे का
स्वातंत्र्याचे कौतुक सोडुन बंधनात मी अडकुन का

दुःख वेदना ज्याने दिधल्या जीवन केले कष्टमयी 
बंध तोडता नात्याचे का दाटुन याव्या सर्व सयी

विरल्या नात्यामधे सुखाचा  दिसतो धागा ओझरता
ऊब पुरेशी धाग्याची त्या नाते फिरुनी पांघरता 

तकलादू जे वाटत होते नाते होते शिणलेले 
जीर्ण जरी ते झाले असले नाते अजुनी तगलेले

✍जयश्री अंबासकर

#गोदातीर्थ_उपक्रम

Tuesday, December 01, 2020

वृत्त - हिरण्यकेशी

वृत्त : हिरण्यकेशी
लगावली - 
लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा 
(मात्रा:३२)

सुखा मिळविण्या किती पळापळ 
उगाच म्हणती सुखास मृगजळ
इथे तिथे सुख विखूरलेले 
जमवत जा तू भरेल ओंजळ

सुखास जर तू बसशिल शोधत
विसरुन जाशिल जगावयाला
तुझ्याचपाशी तुझेच सुख रे
अप्राप्य ना सुख कळेल तुजला

निसर्ग देतो अनंत हस्ते
उचलुन घे तू तुला हवे ते
सुखात सामिल जगास कर तू
नभात साऱ्या फिरेल सुख ते

तुझ्याचपुरते नको जगू तू
विशाल अंबर कवेत घे तू
सवंगडी जग बनेल जेव्हा
सरी सुखाच्या अनुभवशिल तू

जरा हवे दुःखही चवीला 
नकोच रे फक्त सुख जगाया
झकास लज्जत नव्या चवीची
तुलाच लागेल आवडाया

✍जयश्री अंबासकर 
३० नोव्हेंबर २०२०

Monday, November 23, 2020

वृत्त - सौदामिनी

वृत्त  - सौदामिनी
लगागा लगागा लगागा लगा 

तिने मुक्त व्हावे, जगावे पुन्हा
करारी वगैरे दिसावे पुन्हा

नव्या पिंजर्‍याची पुरे कौतुके
किती बंदिवासात रावे पुन्हा

पुन्हा कृष्णबाधाच व्हावी मना
जिणे मोरपंखी मिळावे पुन्हा

अपेक्षाच दुःखास कारण तुझ्या
कितीदा तुला समजवावे पुन्हा

तिचे हासणे आज दुबळे पुन्हा
तिच्या सोसण्याचे पुरावे पुन्हा

शरीरावरी यातनांच्या खुणा
खुलासे जगा काय द्यावे पुन्हा

अकस्मात येणे सुखाचे नको
जुने दुःख खुश्शाल यावे पुन्हा

जयश्री अंबासकर

Monday, November 09, 2020

वृत्त - इंद्रवज्रा

गागालगागा ललगालगागा

ह्रदयात त्याचा शिरकाव आता
श्वासात वावर हळुवार आता

मज्जाव नाही कसलाच आता 
बेखौफ झाले मन द्वाड आता

धरबंध नाही उरला मनाला
अन मागण्याही भलत्याच आता

मधुभास देतो सहवास त्याचा
आयुष्य सारे मदहोश आता

आवेग आहे जगण्यात आता
आयुष्य पळते भरधाव आता

उत्सव मनाचा मनसोक्त आता
जगणेच अवघे मधुचंद्र आता

तावुन सलाखुन मुरले पुरेसे
नाते म्हणावे परिपूर्ण आता

✍जयश्री अंबासकर

Tuesday, November 03, 2020

भिन्न किती

तू गेल्यावर खिन्न किती
जग हे झाले भिन्न किती 

कोलाहल ह्रदयात अता
जगणे मरणासन्न किती

स्वप्न मनी जे रंगवले
झाले छिन्न विछिन्न किती

विस्कटल्या देहात उरे
वैरागी मन सुन्न किती

तृप्तीने जगलास सख्या 
मुक्ती शांत प्रसन्न किती 

जन्म मरण हे अटळ जरी
जीवन रंग विभिन्न किती

✍जयश्री अंबासकर

Monday, October 26, 2020

वृत्त - कलिंदनंदिनी

वृत्त - कलिंदनंदिनी
लगालगा लगालगा 
लगालगा लगालगा

फिरून भेट जाहली
उभी पुन्हा समोर ती
तसाच लुब्ध मी तिथे
अधीर स्पंदने किती

तशीच मिश्किली तिची 
खट्याळ तेच हासणे 
तिलाच शोभते असे
जहाल थेट बोलणे

तशीच ती झऱ्यापरी 
खळाळती अजूनही
तशीच ती विजेपरी 
सळाळती अजूनही

कट्यार वार दृष्टिचा
तसाच तीक्ष्ण भासतो
क्षणात वेध घेऊनी
उरात घाव कोरतो

तशीच बेफिकीर ती
तशीच मुक्त आजही
वसंत पाहतो तिचा
दुरून फक्त आजही

जयश्री अंबासकर

Saturday, October 24, 2020

वृत्त - चंपकमाला

वृत्त – चंपकमाला 
गालल गागा | गालल गागा

मर्द गड्याची हिंमत जेव्हा
या जगण्याला किंमत तेव्हा

सावज होते गाफिल जेव्हा
पारध त्याची निष्ठुर तेव्हा

सोबत पैसा पुष्कळ जेव्हा
मित्र सभोती केवळ तेव्हा 

दु:खद होतो शेवट जेव्हा
काळिज होते व्याकुळ तेव्हा

विकृत होते हे जग जेव्हा
भीषण होते शोषण तेव्हा

पातक होते हातुन जेव्हा
शासन व्हावे तत्पर तेव्हा

जयश्री अंबासकर

Monday, October 19, 2020

चांदणे

इश्कात झुरते चांदणे
घायाळ करते चांदणे

जागून सरते यामिनी
देहात भिनते चांदणे

येतेच परतुन पौर्णिमा
बेभान करते चांदणे

चंद्रास गगनी भेटण्या
आतूर असते चांदणे

सळसळत असता ती इथे
दरवळत असते चांदणे

एकांत विरही भासते
व्याकूळ करते चांदणे

प्रेमात भिजल्या हर मना
आजन्म पुरते चांदणे

अन्‌ रात्र सरताना नभी
विरघळत असते चांदणे

जयश्री अंबासकर

Thursday, October 15, 2020

प्रेमात तुझ्या

तुझ्या आठवांनी श्वासात भिनतो
तुझा गंध ओला नव्याने पुन्हा
प्रेमात पडतो नव्याने तुझ्या मी
गुन्हा तोच घडतो नव्याने पुन्हा

निराळीच असते तुझी भेट प्रत्येक
ऋतूंचे तुझ्या हे किती सोहळे
कसे साठवावे तुला अंतरी मी
तुझे रंग फुलती किती वेगळे

तुला ऐकताना हरखून जातो
तुझे लाघवी बोल छळती मला
म्हणतेस नाही भेटीस जेव्हा
तुझा शब्द खंजीर भासे मला

का मीच व्हावे आतूर इतके   
अप्राप्य असतेस तू कैकदा
झुरावे कधी तू माझ्याविनाही
उतावीळ व्हावे कधी एकदा

✍जयश्री अंबासकर