Friday, September 04, 2020

असोशी

ळख जराही न होती तुझ्याशी
जवळीक वाटे घडावी तुझ्याशी

लाजून होते तुझे बोल तेव्हा
भेटीत होती नव्हाळी जराशी

स्वीकारले ना कधी बंध कुठले
अनुबंध केवळ तुझे काळजाशी

स्वप्नातला गोडवा मी जरासा
ठेवून घेतो नि जपतो उराशी

भेटीत असते किती ती असोशी
भेटीत असते खुमारी जराशी

रस्ता कितीही निराळा असो तो
घेऊन येतो तुझ्या उंबर्‍याशी

विसरून गेलो उरातील दु:खे
आनंद माझा तुझ्या कुंपणाशी

भेटीत करतो खुशामत फुलांनी
नात्यास करतो मशागत जराशी

होती विरक्ती मला जीवनाची
आसक्त झालो पुन्हा जीवनाशी


जयश्री अंबासकर
५ सप्टेंबर २०२०

Thursday, September 03, 2020

झाला हा परिहास म्हणू

भास म्हणू, आभास म्हणू की आला हा दिन खास म्हणू
काय म्हणू या सुखद क्षणांना, आला हा मधुमास म्हणू ?

काजळरात्री कृष्ण तटावर, यमुनेवरती साद पुन्हा
वेड म्हणावे की हृदयाला कृष्णाचा हा ध्यास म्हणू   

विरह म्हणू की शिक्षा होती अपराधांची त्याच जुन्या
जीवन झाले पूर्ण म्हणू की झाला हा वनवास म्हणू

ओढ किती ही, अंतर मिटले रामाचा मी खास जणू
आस म्हणू की कास म्हणू की, रामाचा मी दास म्हणू

कौतुक झाले, त्रागा त्यांचा, दोषी होतो मीच जणू                
दाद म्हणू की आयुष्याचा झाला हा परिहास म्हणू

जयश्री अंबासकर

 

Sunday, August 23, 2020

तुम भी मान लेते

इन्कार की वजह तो हमसे भी पूछ लेते
राहे जरा बदलकर हमको ही ढूंढ लेते

यादे हमारी दिल में मेहफूज अब भी होगी
खुशबू हवा में थोडी उनकी उछाल देते

वो रात पश्मिनी सी भूले तो तुम ना होंगे
झिलमिल वही सितारे सपनों में छोड देते

वो बेरुखी तुम्हारी, वो बेवजह का रुठना
मुसकान एक प्यारी बदले में भेज देते

बाते सदा तुम्हारी मनवा ही हमसे लेते
थोडीसी जिद हमारी कभी तुम भी मान लेते

हम भी तुम्हारी तरहा बेफिक्र काश होते
थोडीसी बेवफाई तब काश हम भी करते

इस जिंदगीसे रुठकर यू अलविदा कहा क्यू  
कुछ सांस तुम हमारे दिल से उधार लेते  

जयश्री अंबासकर


Monday, August 17, 2020

दैवी परिमळ

माझा भारतम्हणता केवळ
अणुरेणुत रुधिराची सळसळ

सोबत आहे सांगुन जातो
खांद्यावरचा स्पर्शहि केवळ

राहत होते पापी निव्वळ
वास्तू शापित म्हणुनी केवळ

दोन टपोर्या डोळ्यांवरती
कडक पहारा करते काजळ

निव्वळ बाष्कळ होते पुष्कळ
शूर निघाला एकच केवळ

मौनातुनही बोलत होती
त्याच्या हृदयामधली खळबळ

घमघमतो हर प्रात:काळी
प्राजक्ताचा दैवी परिमळ

कडे कपारी रोखु शकती
त्या ओढ्याची निर्मळ खळखळ

आईपरि ना दिसते प्रेमळ
वडिलांच्या हृदयाची कळकळ

जयश्री अंबासकर


Saturday, August 15, 2020

किती भोग बाकी असावेत नक्की

किती श्वास द्यावे नि घ्यावेत नक्की
किती श्वास बाकी उरावेत नक्की

कसा काय साबित गुन्हा व्हायचा तो
पुरावे किती स्पष्ट द्यावेत नक्की

झुरावे, झुकावे….गुलामी करावी
अपेक्षा तुझ्या काय आहेत नक्की

न ओळख कुणाची न अनुबंध कुठले
कसे सूर जुळले असावेत नक्की

तुझे बंद डोळे उघडण्यास अजुनी
किती क्रूर अपराध व्हावेत नक्की

असावी किती ओल नात्यात अपुल्या
किती खोल अंकुर रुजावेत नक्की

किती क्लेश देतोस रे पांडुरंगा
किती भोग बाकी असावेत नक्की

जयश्री अंबासकर


Wednesday, August 12, 2020

मी भस्मसात झालो

सौंदर्य पाहुनिया, मी मंत्रमुग्ध झालो
ते अग्निकुंड होते, मी भस्मसात झालो

इश्कात मी बुडालो, बदनाम खूप झालो
बदनाम जाहलो पण, मी नामवंत झालो

जालिम तिच्या अदा अन्‍  विभ्रम किती निराळे
घायाळ फक्त मी ना, सारेच लुब्ध झालो

अभिमान फेकुनी मी, आशाळभूत झालो
दारातला तिच्या मी, लाचार श्वान झालो

आयुष्य उधळले मी, सारे तिच्याच पायी
वणव्यात वासनेच्या,  मी बेचिराख झालो

जयश्री अंबासकर

Sunday, August 09, 2020

पाझर कितीक सार्‍या दगडात पाहिले मी

मातापित्यास जेव्हा सौख्यात पाहिले मी
सौख्यास नांदताना सदनात पाहिले मी

त्या मैफिलीत सारे गंधर्व गात होते
ते सोहळे स्वरांचे साक्षात पाहिले मी

आईस रांधताना तादात्म्य पाहिले मी
वात्सल्य त्रिभुवनाचे घासात पाहिले मी

कविता, गझल नि गाणे ऐटीत वाचतो तो
शर शब्द मधुर त्याच्या भात्यात पाहिले मी

साऱ्या चराचरी या, नव-स्त्रोत जीवनाचा
पाझर कितीक साऱ्या दगडात पाहिले मी

वैराण भावना अन् स्थितप्रज्ञ कोरडेपण
निवडुंग रान सारे नात्यात पाहिले मी

जयश्री अंबासकर
१०.८.२०२०

Thursday, August 06, 2020

रुजवात

रिमझिमत नाचत
आली नाजुकशी सर
हलकेच अंतरीची
तिने छेडियली तार

सृष्टी हसली गालात
उगाचंच खुळ्यागत
सारे सारे आरस्पानी
सारे किती स्वप्नवत

लहरत सवे आला
वारा खट्याळ नाठाळ
पसरला आसमंती
मृदगंधी दरवळ

इंद्रधनुची कमान
उमलली आकाशात
मोती माळा ओघळल्या
पानापानात फांद्यात

धरतीचे पावसाचे
पुन्हा हितगुज झाले
भिजण्याचे रुजण्याचे
नवे सोहळे जाहले


जयश्री
अंबासकर
..२०२०

 


Sunday, July 19, 2020


तुझं येण असंच असतं
वादळी….
सगळीकडे गाजावाजा करत…
आणि मग भेटतोस कडकडून
सर्वांदेखत….
अगदी राजरोसपणे….. !!
तुझ्या येण्याची नांदी मिळताच….
मी धाव घेते
जिथून तू दिसशील, भेटशील तिथे … !
एक कुतूहल,
माझ्याही मनात….
आज कसा भेटणार आहेस मला…
मी उत्सुक असते
गार वार्‍याची झुळूक पाठवतोस आधी
मूड बनवायला….
आणि मग वाट बघायला लावतोस…
कधी टपोरे थेंब पाठवतोस
तरी कधी मुसळधार सरी घेऊन येतोस
कधी नुसताच गडगडाट आणि लखलखाट
आणि खूप वाट बघितल्यानंतर…
बेभान कोसळतोस !
तुझं ते जीव तोडून कोसळणं मी झेलत राहते…
तू कोसळत राहतोस पूर्ण रिता होईस्तोवर…
झिरपत जातोस मनाच्या आतपर्यंत
चिंब चिंब होते मी !
डोळे मिटून …
तुझं अस्तित्व तनामनात लपेटून घेते
आता मनात असतोस
फक्त तू….
आणि
तू फुलवलेला श्रावण !

जयश्री अंबासकर
१९.७.२०२०