Saturday, August 15, 2020

किती भोग बाकी असावेत नक्की

किती श्वास द्यावे नि घ्यावेत नक्की
किती श्वास बाकी उरावेत नक्की

कसा काय साबित गुन्हा व्हायचा तो
पुरावे किती स्पष्ट द्यावेत नक्की

झुरावे, झुकावे….गुलामी करावी
अपेक्षा तुझ्या काय आहेत नक्की

न ओळख कुणाची न अनुबंध कुठले
कसे सूर जुळले असावेत नक्की

तुझे बंद डोळे उघडण्यास अजुनी
किती क्रूर अपराध व्हावेत नक्की

असावी किती ओल नात्यात अपुल्या
किती खोल अंकुर रुजावेत नक्की

किती क्लेश देतोस रे पांडुरंगा
किती भोग बाकी असावेत नक्की

जयश्री अंबासकर


Wednesday, August 12, 2020

मी भस्मसात झालो

सौंदर्य पाहुनिया, मी मंत्रमुग्ध झालो
ते अग्निकुंड होते, मी भस्मसात झालो

इश्कात मी बुडालो, बदनाम खूप झालो
बदनाम जाहलो पण, मी नामवंत झालो

जालिम तिच्या अदा अन्‍  विभ्रम किती निराळे
घायाळ फक्त मी ना, सारेच लुब्ध झालो

अभिमान फेकुनी मी, आशाळभूत झालो
दारातला तिच्या मी, लाचार श्वान झालो

आयुष्य उधळले मी, सारे तिच्याच पायी
वणव्यात वासनेच्या,  मी बेचिराख झालो

जयश्री अंबासकर

Sunday, August 09, 2020

पाझर कितीक सार्‍या दगडात पाहिले मी

मातापित्यास जेव्हा सौख्यात पाहिले मी
सौख्यास नांदताना सदनात पाहिले मी

त्या मैफिलीत सारे गंधर्व गात होते
ते सोहळे स्वरांचे साक्षात पाहिले मी

आईस रांधताना तादात्म्य पाहिले मी
वात्सल्य त्रिभुवनाचे घासात पाहिले मी

कविता, गझल नि गाणे ऐटीत वाचतो तो
शर शब्द मधुर त्याच्या भात्यात पाहिले मी

साऱ्या चराचरी या, नव-स्त्रोत जीवनाचा
पाझर कितीक साऱ्या दगडात पाहिले मी

वैराण भावना अन् स्थितप्रज्ञ कोरडेपण
निवडुंग रान सारे नात्यात पाहिले मी

जयश्री अंबासकर
१०.८.२०२०

Thursday, August 06, 2020

रुजवात

रिमझिमत नाचत
आली नाजुकशी सर
हलकेच अंतरीची
तिने छेडियली तार

सृष्टी हसली गालात
उगाचंच खुळ्यागत
सारे सारे आरस्पानी
सारे किती स्वप्नवत

लहरत सवे आला
वारा खट्याळ नाठाळ
पसरला आसमंती
मृदगंधी दरवळ

इंद्रधनुची कमान
उमलली आकाशात
मोती माळा ओघळल्या
पानापानात फांद्यात

धरतीचे पावसाचे
पुन्हा हितगुज झाले
भिजण्याचे रुजण्याचे
नवे सोहळे जाहले


जयश्री
अंबासकर
..२०२०

 


Sunday, July 19, 2020


तुझं येण असंच असतं
वादळी….
सगळीकडे गाजावाजा करत…
आणि मग भेटतोस कडकडून
सर्वांदेखत….
अगदी राजरोसपणे….. !!
तुझ्या येण्याची नांदी मिळताच….
मी धाव घेते
जिथून तू दिसशील, भेटशील तिथे … !
एक कुतूहल,
माझ्याही मनात….
आज कसा भेटणार आहेस मला…
मी उत्सुक असते
गार वार्‍याची झुळूक पाठवतोस आधी
मूड बनवायला….
आणि मग वाट बघायला लावतोस…
कधी टपोरे थेंब पाठवतोस
तरी कधी मुसळधार सरी घेऊन येतोस
कधी नुसताच गडगडाट आणि लखलखाट
आणि खूप वाट बघितल्यानंतर…
बेभान कोसळतोस !
तुझं ते जीव तोडून कोसळणं मी झेलत राहते…
तू कोसळत राहतोस पूर्ण रिता होईस्तोवर…
झिरपत जातोस मनाच्या आतपर्यंत
चिंब चिंब होते मी !
डोळे मिटून …
तुझं अस्तित्व तनामनात लपेटून घेते
आता मनात असतोस
फक्त तू….
आणि
तू फुलवलेला श्रावण !

जयश्री अंबासकर
१९.७.२०२०

Thursday, July 16, 2020

ऋतू येत होते ऋतू जात होते


तरही गझल - ह्या गझलेतला मिसरा आहे  वैभव जोशी ह्यांचा "ऋतू येत होते ऋतू जात होते"

ऋतू येत होते ऋतू जात होते
परी मी सख्याच्याच ध्यासात होते

अता वाटते शांतता जीवघेणी
गदारोळ कारण नशीबात होते

कसा रंग येईल त्या मैफिलीला
तुझे सूर सारेच मौनात होते

कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी
इथे चांदणे बाहुपाशात होते

सखा आज येणार माहीत होते
तसे पूर्ण संकेत हृदयात होते

तिन्हीसांज मंदावली का अशी ही
उसासे तिच्या आज श्वासात होते

इथे स्वैर सारे, न लज्जा न काही
इथे सर्व काही बिछान्यात होते

न होते भिकारी, न लाचार कोणी
तिथे सर्व अपुल्या रुबाबात होते

कुणाला दिले ना जरा दु:ख त्याने
जुने भोग त्याच्याहि स्मरणात होते


जयश्री अंबासकर

Friday, June 26, 2020

यश तुझे तुझ्या दारी


नको जगाकडे बघू
असा लाचार होऊन
हिस्सा तुझा सुद्धा आहे
पहा डोळे भिडवून

तुझे तुला मिळणार
जरा ठेव हे ध्यानात
नको घाई घाई करु
नशिबाला दे उसंत

नको विसंबू कुठेही
तुझे काम कर तूच
आल्यावर योग्य वेळ
भाग्य शोधेल तुलाच

मनासारखे आपल्या
नसते सदा घडत
बसायचे का म्हणून
मुळूमुळू रे रडत ?

जीव ओतून तू तुझे
काम कर अविश्रांत
तुला नकार देण्याची
मग कुणाची बिशाद

नको करु हाजी हाजी
तू कोणा सोम्या गोम्याची
तूच आहेस स्वयंभू
नको गुलामी कुणाची

जरा बघ रे ठेवून
स्वत:वर तू विश्वास
यश तुझे तुझ्या दारी
मिरवेल हमखास

जयश्री अंबासकर
२६..२०२०




Tuesday, June 23, 2020

उजळेल केव्हा

दुबळ्या मनाचा, आक्रोश काळा, थांबेल केव्हा
सूर्यात माझ्या, पेटून वणवा, उजळेल केव्हा

मार्गात होते, काटेच काटे,  जखमाच जखमा
हळुवार फुंकर, कोणी तयावर, घालेल केव्हा

कुठली न आशा, होती निराशा, पदरात माझ्या
भाग्यातले हे, दुष्चक्र माझे,  संपेल केव्हा

आभाळ येते, भरुनी पुन्हा पण, कोसळ न त्याला
माझा सुगंधी, मनमोगरा मग, बहरेल केव्हा

उलटेच फासे, पडतात कायम, खेळात माझे
माझ्या नशीबी, आहे किती हे, उमजेल केव्हा

कसदार असुनी, माझे बियाणे, पिकते न काही
शेतात माझ्या, सुख मोतियाचे, उगवेल केव्हा

जयश्री अंबासकर

Wednesday, June 03, 2020

अंतहीन

अस्वस्थ जाणिवा
दाटलेला काळोख
घुसमटलेला श्वास
संपलेली आस
सरपटणारा दिवस
संथ काळरात्री
अगतिकता
भूक
लाचारी
आक्रोश..
हतबलता
विझत जाणं
ठिणगीतली आग….
निपचित
राखेच्या ढिगाखाली !!
………
……
अचानक वावटळ
ठिणगीला जाग
आगीचा भडका
भडक्याचा वणवा
वणव्यातली होरपळ
चक्र तेच
पुन्हा पुन्हा
कधी ठिणगी
कधी वावटळ
कधी वणवा..
कधी होरपळ
अंतहीन….
अंतहीन….
…… ???
नाही…. नाही
हा अंत नाही
नक्कीच नाही
पेटलेली ठिणगी
आकाशाला भिडणार
दाटलेला काळोख
उजळून टाकणार
आणि मग….
हातात हात
दैवाची साथ
निधडी छाती
संकटावर मात
नवं क्षितिज
नवी कास
जुनेच हात
पण नवा आज
नव्या दिशांचा
शोध मनात
सुखाचं कारंजं
प्रत्येक घरात !!

जयश्री अंबासकर