Tuesday, March 24, 2009

ओसाड राजमार्ग


सोपं जगायची सवय झाली की ....
कठीण उत्तरं नकोशी होतात

थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन
उत्तरं कशीबशी जुळवता येतात.

उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला
सापडतोच कुठला तरी वशिला

चढ उतार नकोच असतात
आडवळणं मग शोधली जातात

तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत
आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत

मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन
खरी वाट सोयिस्करपणे विसरुन

सवयी त्याच अंगवळणी पडतात
आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात.

जयश्री 

Sunday, March 22, 2009

अशक्य केवळ


तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ

नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ

तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ

तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ

जयश्री

Monday, March 16, 2009

दुसरा कुणीच नाही.....


पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही

गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही
टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही

शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही

काळोख तुंबलेला दाही दिशात सारा
सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही

सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही

जयश्री अंबासकर




Thursday, March 12, 2009

तुझे चांदणे


तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते
तसे सोबतीच्या करारात होते

नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा 
तुझ्या मुक्त केसातही रात होते

पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला    
तुझे दाद देणे अकस्मात होते 

नसावे नशीबात घायाळ होणे 
तुझे तीर सारे पहा-यात होते

निशेला न ऐसेच वैराग्य आले
तुझे चांदणे ऐन बहरात होते

जयश्री

Sunday, March 08, 2009

भूल

भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला
बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला

चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली
बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली

सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा
मत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला

यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला
धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला 

शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली
का निशेची पैंजणे लाटांत त्या रेंगाळली 

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले

जयश्री