आयुष्य स्वत:साठी जगणारे भरपूर लोक असतात पण स्वत:चं आयुष्य फ़क्त दुस-यांसाठी देणारे फ़ार थोडे लोक असतात........ अशोक हा त्यातलाच ...... माझ्या नणंदेचा नवरा ...... त्याने आयुष्याचं अर्धशतक दमदारपणे झळकवलं त्याच्या ५० व्या वाढदिवशी पुढच्या झुंजार शतकी खेळीसाठी दिलेल्या ह्या शुभेच्छा !
प्रिय अशोक,
आयुष्याचा मध्य आला
कांचनाचा योग आला
तृप्त या तव जीवनाचा
दुग्धशर्करायोग आला
ऋण ते मातापित्याचे
केव्हाच तू उतरुन गेला
बंधु-भगिनींना सदा तू
संकटी तारुन गेला
सहजीवनाचा तू असा
समृद्ध पाया रोवला
शिरी राणीच्या तुझ्या तू
प्रिती तुरा रे खोवला
धाक असूनी आदराचा
मित्र बनला तू मुलांचा
गुंफ़ली नाती अशी तू
प्रिय बनला हर दिलाचा
जीवनी तुझिया सदा या
घडो आनंद सोहळे
लाभो तुला हे दीर्घ आयु
सार्थ आणिक आगळे
वर्धापनाच्या या दिनी रे
एक आहे मागणे
नित्य आम्हाला दिसू दे
गोड तव हे हासणे
जयश्री